![]()
राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात सोलापूरमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. विवाहमांडवा-चौंडाळा रस्त्यावर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील पारधी वस्तीत राहणारे चव्हाण कुटुंब पाचोड येथून आठवडी बाजार करून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. याच दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील एक पुरुष, दोन महिला आणि एका लहानग्या चिमुकल्याची जागीच प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात एवढा भीषण होता की, स्थानिकांना कोणतीही मदत करण्यापूर्वीच दुचाकीवरील सर्व चौघांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला असून, या अपघाताचा पुढील सखोल तपास सुरू केला आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात:दुचाकी आणि पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू