![]()
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात आरोग्य सांभाळणे हे मोठे आव्हान असून, म्हातारपण निरोगी जाण्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’, ‘एम.ए. योगशास्त्र’ आणि ‘पी.जी. डिप्लोमा योगा थेरपी’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या परिसरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला योगप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरु डॉ. बारहाते यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. सुप्रिया चकोले, डॉ. निता गिरी, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन व विस्तारचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, उपकुलसचिव मंगेश वरखेडे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते. विदर्भातील कौटुंबिक वास्तवावर भाष्य करताना कुलगुरूंनी सांगितले की, शिक्षण आणि नोकरीसाठी तरुण पिढी मोठ्या शहरांमध्ये स्थायिक होत आहे, तर वृद्ध आई-वडील मागे राहत आहेत. या बदललेल्या परिस्थितीत आरोग्याच्या नवीन समस्या निर्माण होत आहेत. भारताला लाभलेली योगाची प्राचीन ज्ञान परंपरा अत्यंत समृद्ध असून, योग दिनानिमित्त शिकलेले प्राणायाम आणि योगासने दैनंदिन जीवनात नियमितपणे समाविष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा आणि महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनघा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेश पिदडी यांनी आभार मानले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भजनही गायले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि अमरावतीमधील योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
कुलगुरु डॉ. बारहाते: सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास आवश्यक:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती विद्यापीठात कार्यक्रम