![]()
महाजेनकोच्या नंदगाव येथील अॅश बंड (राखेचा बंधारा) मधील अयोग्य आणि अशास्त्रीय राख विल्हेवाटीमुळे स्थानिक पर्यावरण, नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. नंदगाव परिसरातील पाळीव जनावरांना चरण्यासाठी याच अॅश बंड ओलांडून जावे लागते. राख साचलेल्या दलदलीतून आणि प्रदूषित पाण्यातून वाट काढताना प्राण्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या राखेमुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ पशुधनच नाही, तर या परिसरातून उडणाऱ्या राखेमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार जडत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ‘सेंटर फॉर डिकेंटरिंग अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या संस्थापिका लीना बुधे यांनी महाजेनकोच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, महाजेनकोकडे या बंधाऱ्यात राख टाकण्याचे कोणतेही ठोस नियोजन नाही. या ठिकाणी नियमानुसार अॅश लॅगून तयार करण्यात आलेले नाहीत, तसेच जमिनीखाली राखेचे पाणी झिरपू नये म्हणून आवश्यक असलेले लायनिंग देखील केलेले नाही. महाजेनकोकडून पर्यावरण नियमांचे हे सर्रास उल्लंघन आहे, असा थेट आरोप लीना बुधे यांनी केला आहे. या भागात अशास्त्रीय पद्धतीने राखेची विल्हेवाट लावली जात असल्याने जमिनीची सुपीकता आणि भूगर्भातील पाणी दूषित होत आहे. एवढे मोठे नुकसान होत असतानाही महाजेनकोला जाब विचारणारे कोणीही नाही आणि प्रशासनाला स्थानिक नागरिक, शेतकरी व पर्यावरणाची कोणतीही पर्वा नसल्याचे चित्र आहे. या संपूर्ण प्रकरणातील प्रशासकीय उदासीनता आणि जबाबदारीचा अभाव आता चव्हाट्यावर आला आहे.
Source link
नंदगावचा अॅश बंड ठरतोय घातक:महाजेनकोच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यावरण, पशुधनाचा जीव धोक्यात