![]()
तिवसा बसस्थानक परिसरात चार महिन्यांपूर्वी झालेल्या ५० हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात तिवसा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका सराईत पाकीटमाराला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील ८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली होती. डेहणी (ता. तिवसा) येथील महेंद्र आत्माराम वानखडे (वय ५२) हे मजुरीतून जमा झालेले ५० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी तिवसा येथे आले होते. स्टेट बँक उघडण्यास वेळ असल्याने ते बसस्थानकावर थांबले होते. सकाळी सुमारे ९.३० वाजता अमरावतीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या पँटच्या खिशातील ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, १ जुलै रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोझरी बसस्थानक परिसरात सापळा रचून सय्यद नूर सय्यद गफ्फार (वय ४५, रा. अकबर नगर, अमरावती) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, सय्यद गफ्फारने तिवसा येथील स्टेट बँक ते बसस्थानकादरम्यान गर्दीचा फायदा घेत महेंद्र वानखडे यांच्या खिशातून ५० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. चोरीतील बहुतांश रक्कम खर्च झाल्याचे त्याने सांगितले असून, उर्वरित ८ हजार ५०० रुपये पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिवसा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार रवींद्र लांजेवार, नितीन बौरसिया तसेच पोलीस कर्मचारी शुभम गादेकर, नंदू जोगदंडे आणि सागर क्षीरसागर यांनी केली.
Source link
तिवसा बसस्थानकातील 50 हजारांच्या चोरीचा गुन्हा उघड:सराईत पाकीटमार अटकेत, 8 हजार 500 रुपये जप्त