Headlines

दुष्काळावर मात करण्यासाठी 'वनराई बंधारा' उपक्रमाला व्यापक स्वरूप द्या:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन; बीडमध्ये अभियान राबवणार




राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या ‘वनराई बंधारा’ उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. ‘वनराई बंधारा’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या देवगिरी निवासस्थानी नुकतेच झाले. यावेळी त्या बोलत होत्या. पुस्तक प्रकाशनावेळी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, संस्थेचे सचिव अमित वाडेकर, वनराईचे जनसंपर्क अधिकारी शशांक गराडे उपस्थित होते. जलसंधारण, मृदासंवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी पुण्यातील वनराई संस्था गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत कार्यरत आहे. पावसाळ्यानंतर ओढ्या-नाल्यातून आणि लहान नदीच्या पात्रातून वाहून जाणारे शेवटचे सरते पाणी अडवण्या – मुरवण्यासाठी वनराई संस्थेने वनराई बंधाऱ्याचे तंत्र विकसित केले आहे. पावसाचे पाणी अडवून ठिकठिकाणी जलसाठे निर्माण करणे, भूजल पातळी वाढवणे या उद्देशाने वनराई बंधारे उभारले जातात. स्थानिक लोकसहभागातून राबविता येणारा हा उपक्रम दुष्काळग्रस्त आणि पाणीटंचाईच्या भागांसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असून या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून प्राधान्याने बीड जिल्ह्यात वनराई बंधारे अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आणखी १९ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पीकपंचनामे, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळाच्या तीव्रतेच्या भागांत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकतेनुसार लहान क्षमतेचे टँकर वापरण्याचे तसेच चारा उपलब्धतेसाठी पर्यायी उपाययोजनांचा अभ्यास करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या परिस्थितीत जलसंधारणाच्या विकेंद्रित आणि लोकसहभागाधारित उपाययोजनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘वनराई बंधारा’ ही कमी खर्चात आणि स्थानिक सहभागातून उभारता येणारी जलसंधारणाची पद्धत असून, ओढे-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी ठराविक अंतरावर अडवून ते जमिनीत मुरविण्यास तिची मदत होते. त्यामुळे भूजल पुनर्भरण वाढण्यास, तसेच विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागतो. मृदा-जल संधारण, वनीकरण, शेती, उपजीविका आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये शासनाला धोरणात्मक उपाययोजना सुचवणे आणि प्रत्यक्ष तळागाळात काम करणे या दुहेरी भूमिकेतून वनराई संस्था गेली चार दशके कार्यरत आहे. याच भूमिकेतून सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘वनराई बंधारे अभियान’ व्यापक स्वरूपात ठिकठिकाणी राबविण्यात यावे, असे आवाहन वनराई संस्थेच्या वतीने शासनाला करण्यात आले आहे अशी माहिती वनराई संस्थेचे विश्वस्त सागर धारिया यांनी दिली. या अभियानासाठी सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य करण्यास वनराई संस्था कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *