Headlines

Sanjay Shirsat Hits Back at Dharashiv Broker Allegations


“आश्रमशाळांचे अनुदान किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी समाजकल्याण विभागात कुणीही पैसे मागितल्याचे समोर आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे माझे स्पष्ट निर्देश आहेत. धाराशिवच्या ज्या संस्थाचालकाने माझ्यावर आणि स्वीय सहाय्यकावर आरोप केले

.

पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी धाराशिवच्या संस्थाचालकाने केलेल्या आरोपांचे खंडन केले, तसेच संजय राऊतांचे वक्तव्य, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, पार्थ पवार जमीन प्रकरण, मुख्य निवडणूक आयुक्त वाद आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले.

धाराशिवच्या आश्रमशाळा चालकाच्या आरोपांवर स्पष्टीकरण

धाराशिवचे आश्रमशाळा संस्थाचालक अरुण निटूरे यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, “ज्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की तो माणूस शुद्धीत होता की दारू पिऊन बोलत होता. हे लोक संस्थाचालक नसून केवळ दलाल आहेत. संस्थाचालकांच्या नावाखाली फिरून स्वतःच्या फायद्यासाठी वसुली करणे हाच यांचा धंदा होता.”

दुकानदारी बंद केल्याने पोटदुखी

“माझ्या विभागात आश्रमशाळा, वसतिगृहे आणि अनाथालयांशी संबंधित 165 संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या 12 ते 13 वर्षांपासून प्रलंबित होते. आम्ही त्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला असून मी स्वतः छत्रपती संभाजीनगर येथे सर्व संस्थाचालकांची अधिकृत बैठक घेतली होती. त्या बैठकीत मी स्पष्ट बजावले होते की, जर कुणी एका रुपयाचीही मागणी केली किंवा पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. आम्ही या दलालांची दुकानदारी पूर्ण बंद केली, त्यामुळेच ही मंडळी आता अंगावर येत आहेत.”

चेकद्वारे पैसे घेतल्याचे पुरावे समोर आणणार

“काही दलालांनी संस्थाचालकांकडून थेट चेकने पैसे लाटल्याचे प्रकारही घडले आहेत. माझ्याकडे अशा प्रत्येकाची संपूर्ण माहिती आहे. या दलालांच्या तोंडी लागणे मला कमीपणाचे वाटते, मात्र विभागाच्या वतीने यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत.”

बाळासाहेबांनी राऊतांना लाथ मारून हाकलले असते

मीनाक्षी शिंदे यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून ठाकरे गटाने केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “संजय राऊत हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचा आव आणतात. पण राऊतांची विधाने आणि वक्तव्ये जर बाळासाहेबांनी ऐकली असती, तर त्यांना ‘पलट जा’ म्हणून पाठीवर लाथ मारून पक्षातून बाहेर काढले असते. शिवसेनाप्रमुख कधीही अशा आगलाव्या आणि आगाऊ प्रवृत्तीला खपवून घेत नसत. उबाठा गटामध्ये आमदार, खासदार, नगरसेवक आणि महापौरांची मोठी गळती झाली, कारण तिथे कार्यकर्त्यांना शून्य भविष्य दिसत होते. तरीही त्यांचा अहंकार आणि गुर्मी अजूनही संपलेली नाही.”

एमपीएससी विद्यार्थी व रोहित पवारांच्या आंदोलनावर ताशेरे

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई मान्य करत रोहित पवारांवर निशाणा साधला. “एमपीएससीच्या प्रक्रियेत निश्चितच शिथिलता आली आहे, हे नाकारता येणार नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही मुलांना नियुक्ती पत्र मिळण्यासाठी महिनान् महिना वाट पाहावी लागते. माझ्या विभागाने गेल्या आठवड्यात ३९ पात्र विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्ती पत्रे दिली आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शासन बदनाम होत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.”

रोहित पवारांची नौटंकी

“रोहित पवारांना आता कुठेही जाऊन 50-100 लोक जमा करून नौटंकी करण्याची सवय लागली आहे. पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याने स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत. आंदोलनादरम्यान पत्रकारांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे.”

पार्थ पवार जमीन प्रकरण व इतर राजकीय मुद्दे

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीबाबत उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांवर बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “न्यायालयाने जे काही आदेश किंवा निर्देश दिले आहेत, त्यानुसारच शासन व पोलीस पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करतील.”

“ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात जो काही वाद निर्माण झाला आहे, त्यावर केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करू नये, याला आमचा स्पष्ट विरोध आहे.”

मराठवाड्यातील दुष्काळ आणि सिंचन अनुशेष

“मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात दुष्काळाची भीषण तीव्रता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळ पाहणी दौरा करणे ही चांगली बाब असून सकारात्मक सूचनांचे सरकार नेहमीच स्वागत करते. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने पावले उचलावीत, निधी वाटपात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही,” अशी ग्वाही संजय शिरसाट यांनी दिली.

——————————————–

हेही वाचा…

शिरसाटांकडे 75 कोटींचा बंगला, 5-5 कोटींच्या गाड्या आल्या कुठून?: आश्रमशाळा चालकाचा मंत्री संजय शिरसाटांवर आरोप; शाळांच्या पैशांसाठी पीए भंडारे 35 लाख मागतो!

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर धाराशिव येथील आश्रमशाळा संस्थाचालक अरुण निटूरे यांनी अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका इमारतीच्या गच्चीवरून स्वतः रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये निटूरे यांनी मंत्री शिरसाट, त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि समाजकल्याण विभागाच्या कारभारावर संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. “गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान वर्षानुवर्षे अडवून ठेवायचे आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर पीएंच्या माध्यमातून 35 ते 40 लाखांची उघड लाच मागायची,” असा थेट आरोप करत निटूरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.