![]()
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि भविष्यातील धारावी नेमकी कशी असेल, याची माहिती देण्यासाठी आज ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अभिनंदन केले. याचवेळी त्यांनी आज पुकारण्यात आलेल्या मुंबई कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरही सडकून टीका केली. ‘फेक नॅरेटिव्ह उघडकीस आलाय’ कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता सर्व पर्दाफाश झाला आहे. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर विरोधकांचा जो ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटा प्रचार) होता, तो आता पूर्णपणे उघडकीस आला आहे (बस्ट झाला आहे). तरीही हा खोटा प्रचार पुढे नेण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे, पण यात त्यांना अजिबात यश मिळणार नाही.” ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’: आजची धारावी अन् उद्याचे स्वप्न धारावीचा पुनर्विकास प्रकल्प नेमका कसा असणार आहे, याची रिअल-टाइम माहिती या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये देण्यात आली आहे. धारावीचा इतिहास, आजची धारावी आणि तिथले लोकजीवन याचे सविस्तर चित्रण येथे पाहायला मिळते. धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून ते मुंबईचे एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथील कुंभारवाडा, प्लास्टिक रिसायकलिंग, चामड्याचे (लेदर) उद्योग आणि खाद्य उद्योग यावर एक मोठी अर्थव्यवस्था चालते. या सर्व उद्योगांचे आजचे दर्शन आणि उद्याच्या विकसित धारावीत या उद्योगांसाठी कशी उत्तम व्यवस्था असेल, याचे प्रात्यक्षिक या सेंटरमध्ये मांडण्यात आले आहे. सॅम्पल फ्लॅट्स आणि आभासी अनुभव पुनर्विकासानंतर धारावीचा लेआऊट कसा असेल, पुनर्वसन कसे होईल, नागरिकांना मोकळ्या जागा कशा मिळतील आणि त्यांचे जीवन कसे बदलेल, हे एका ‘इमर्सिव्ह एक्सपिरियन्स’च्या (आभासी अनुभव) माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. आज जे लोक छोट्याशा जागेत उद्योग करत आहेत, त्यांना भविष्यात चांगल्या जागेत उद्योग कसा करता येईल, तसेच चांगल्या शाळा, अद्ययावत रुग्णालये आणि धार्मिक स्थळांची संकल्पनाही येथे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, पुनर्वसनात धारावीकरांना जी घरे मिळणार आहेत, त्याच्या नमुना सदनिका (Sample Flats) या सेंटरमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन हे फ्लॅट्स पाहता येतील. त्यामुळे धारावी पुनर्विकासाबाबत लोकांच्या मनात जे अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा.. मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे 4 वाजता आंदोलन:मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त कॉकरोच जनता पार्टी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहे. CJPचे संयोजक अभिजीत दीपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही असल्याचे म्हटले होते. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सविस्तर वाचा
Source link
मुख्यमंत्री फडणवीसांची CJPच्या आंदोलनावर टीका:म्हणाले- विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश, खोट्या प्रचाराला यश मिळणार नाही