![]()
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने संतप्त महिलांनी , सोमवारी ता. १६ ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. यावेळी महिला व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन केले. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे सुमारे १८ हजार लोकसंख्या असून गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ८ कोटी रुपये खर्चुन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सदर योजनेचे काम दोन वर्षापासून सुरु असून अद्यापही गावात नळाद्वारे पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चुन हाती घेण्यात आलेली योजना पाण्यातच गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, गावात पाणी नसल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, भास्कराव पाटील, संतोष कावरखे, विठ्ठल साळुंखे, कैलास देवकर, राजू देवकर, सुखदेव देवकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. यावेळी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन तास ठाण मांडले. त्यानंतर प्रशासक तथा विस्तार अधिकारी विनोद देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना धारेवर धरले. कोट्यावधी रुपये खर्चुनही गावात पाणी का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत उपाय योजना करून गावाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांत बैठक घेऊन पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. क्रांतीकारी शेतकरी संघटना आंदोलन करणार गजानन कावरखे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे म्हणाले, जलजीवन मिशनवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर या कामांची चौकशी झालीच पाहिजे. नागरिकांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, ता. २३ रोजी तिव्र आंदोलन केले जाईल.
Source link
गोरेगावमध्ये पाणीप्रश्नावर महिलांचा घागर मोर्चा:ग्रामपंचायत कार्यलयात दोन तास ठिय्या आंदोलन, लाखो रुपये खर्चुनही पाणी मिळत नसल्याने संताप