काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन), राज्यातील मतदार यादीतील घोळ, अजित पवार अपघात प्रकरण, गड
.
संविधानाला धक्का लावणाऱ्या पुनर्रचनेला काँग्रेसचा तीव्र विरोध
संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक आणले जाण्याची चर्चा असून, यावरून महाविकास आघाडीत दोन मतप्रवाह दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी जागा वाढत असतील तर पाठिंबा देण्याचे संकेत दिले, तर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी याला विरोध दर्शवला आहे. यावर भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मात्र काँग्रेस पक्ष या पुनर्रचनेला पूर्णपणे विरोध करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार तयार केलेल्या संविधानिक व्यवस्थेला धक्का लावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासदार आणि आमदारांची संख्या वाढवल्यास त्याचा मोठा आर्थिक भार सर्वसामान्य जनतेवर पडेल, त्यामुळे देशाला तोडणाऱ्या आणि जनतेची लूट करणाऱ्या या व्यवस्थेचा काँग्रेस कडाडून विरोध करेल, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार, महागाई आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सरकारच्या धोरणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करताना पटोले म्हणाले की, जनतेचे पैसे खर्च करून परदेशात जायचे, तिथे पुरस्कार घ्यायचे आणि स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची, हे योग्य नाही. महागाई गगनाला भिडली असताना गृहमंत्री अमित शहा त्यावर का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोग आणि मतदार यादी
महाराष्ट्रात पार पडलेल्या विशेष मोहिमेत 2 कोटींहून अधिक मते कमी झाली असून ती नेमकी कोणाची आहेत, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. आम्ही आयोगावर आरोप केल्यास भाजप त्याचे उत्तर देते, यावरून दोघांची साठगाठ स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपद नसल्याने विरोधी पक्षाला बंगले मिळणार नसल्यावरून त्यांनी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणावर टीका केली.
‘दिमागी नक्षली’ टीकेला प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत केलेल्या ‘दिमागी नक्षली’ या विधानाचा पटोले यांनी समाचार घेतला. हरियाणात नवनाथ तिवारी आणि अभिषेक तिवारी यांच्याकडे हजारो काडतुसे सापडल्याचा संदर्भ देत, ही काडतुसे कोणत्या शस्त्रास्त्र कारखान्यातून आली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असे ते म्हणाले. गडचिरोली आणि सह्याद्रीतील जंगले मूठभर लोकांसाठी नष्ट केली जात असल्यानेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढला असून सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार अपघात प्रकरण आणि रोहित पवारांची पत्रकार परिषद
अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन ‘मफलर मॅन’ कोण आहे हे उघड करणार आहेत. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही, हा मुद्दा मी स्वतः विधानसभेत उपस्थित केला होता. हा घातपात आहे की अपघात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित पवार आपल्या कुटुंबासाठी याचा पाठपुरावा करत असून त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती समोर येते, यानंतरच मी सविस्तर प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींचा दौरा आणि उत्तर प्रदेश जागावाटप
राहुल गांधी हे अमेरिकेतील एका विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी गेले असून, त्यांचा दौरा जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारा नाही, असे सांगत पटोले यांनी भाजपच्या ‘पार्ट टाईम राजकारण’ या टीकेला प्रत्युत्तर दिले. जशी मुघलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची भीती वाटायची, तशीच भीती भाजपला राहुल गांधींची वाटते, असे ते म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने 181 जागांची मागणी केली असून, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची समिती यावर अंतिम निर्णय घेईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
——————————————————————–
हेही वाचा…
पुण्यात महायुतीच्या दिग्गजांची खलबतं: मुख्यमंत्री फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोमवारी (16 नोव्हेंबर) पुण्यात दाखल होत अमित शहा यांची भेट घेतली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू. मेरिएट हॉटेलमध्ये या बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी