Headlines

अमित शाह यांनी अजित पवारांना मित्र आणि सहकारी म्हटले:म्हणाले, त्यांचे जाणे वैयक्तिक नुकसान; तीन-चार दशकांत निर्माण झालेली पोकळी कोणी भरू शकणार नाही




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवडचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांचे जाणे हे माझ्या वैयक्तिक जीवनातीलही मोठे नुकसान आहे. तीन-चार दशकांत एका व्यक्तीने निर्माण केलेली पोकळी सामूहिक प्रयत्न करूनही कोणी भरून काढू शकणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पवार कुटुंबीय उपस्थित होते. अजित पवार हे केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर माझे अंतरंग मित्र आणि अत्यंत निकटचे साथी होते, अशी आठवण शाह यांनी सांगितली. पंचायत राज, सहकार, कृषी आणि आधुनिक नगरविकास या क्षेत्रांची सखोल जाण आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. राजकीय चर्चांमध्ये ते कधीही संदिग्ध भूमिका घेत नसत. त्यांचे उत्तर नेहमी ‘हो’ किंवा ‘नाही’ असे स्पष्ट असायचे. सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचूनही त्यांनी जमिनीशी असलेले नाते कायम जपले. अजित पवार यांना सहकार क्षेत्राचा ‘ज्ञानकोश’ संबोधत शाह म्हणाले, दूध संघ, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती. साखर कारखान्यांच्या प्राप्तिकराचा प्रलंबित प्रश्न केंद्र सरकारने सोडवल्यानंतर सकाळी पावणेसात वाजताच त्यांचा फोन आला होता. सहकार क्षेत्राला मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील त्यांच्या कामाचीही शाह यांनी विशेष आठवण सांगितली. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असताना अजितदादा सकाळी सात वाजता मंत्रालयात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत होते. दुपारपर्यंत संपूर्ण कामाचा अहवाल केंद्राला पाठवत होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा विलक्षण होती. पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते नेहमी आग्रही असत. असा स्पष्टवक्ता, अभ्यासू आणि विकासाची जाण असलेला नेता गमावणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे, असे शाह यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *