Headlines

मुलीच्या 'त्या' ट्विटनंतर जितेंद्र आव्हाड मैदानात:म्हणाले- तिला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे; विलीनीकरण, मंत्रिपद आणि शरद पवारांच्या भूमिकेवर रोखठोक भाष्य




मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “जर माझा पक्ष पुनर्रचनेला पाठिंबा देत असेल, तर मी त्याचा निषेध करते,” असे ट्विट नताशा आव्हाड यांनी केल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली होती. या सर्व वादावर आणि इतर राजकीय चर्चांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. “मी आज पक्षाचा प्रवक्ता म्हणून नाही, तर केवळ माझ्या मुलीमुळे तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे,” असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मुलीच्या स्वातंत्र्यावर घरातून कधीच अंकुश ठेवला नाही नताशा आव्हाड यांच्या पक्षविरोधी भूमिकेबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, “ती माझी कन्या आहे आणि आमच्या घरातून आजपर्यंत तिच्या विचारस्वातंत्र्यावर कधीही अंकुश ठेवण्यात आलेला नाही. तिच्या बोलण्याला आणि वाचण्याला तिचा स्वतःचा एक दृष्टिकोन आहे. तिला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमच्या पक्षाचे नेते, विशेषतः शरद पवार यांनी कधीही कोणाला ‘बोलू नकोस’ असे सांगितलेले नाही. शरद पवार हे नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारे नेते राहिले आहेत.” नताशा सध्या एका परिषदेसाठी बाहेर गेली असून तिने जे मत मांडले ते तिचे वैयक्तिक वाचन आणि अभ्यासातून आलेले आहे, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जुना किस्सा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना आव्हाड यांनी 40 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “शरद पवारांनी गेल्या 40 वर्षांत अनेकदा टीकेचे घाव झेलले आहेत, पण त्यांनी कोणाचाही आवाज दाबला नाही. एकदा मी पवारांचे अत्यंत जवळचे मित्र रामनाथ गोयंका यांच्या ‘एक्स्प्रेस’ वृत्तपत्राचे अंक जाळले होते. त्यावरून अनेकांनी पवारांकडे तक्रारी केल्या. तेव्हा पवारांनी मला फोन करून फक्त कारण विचारले आणि माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर ‘तुझे कारण बरोबर आहे, तुला तुझे स्वातंत्र्य आहे,’ असे सांगितले होते. अशा नेत्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावल्याची टीका करणे चुकीचे आहे.” विलीनीकरण आणि मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम राज्यात सध्या सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि मंत्रिपदाच्या चर्चांवर आव्हाड यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “सत्तेच्या किंवा विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मी पूर्वीही नव्हतो, दादांसोबतही नव्हतो आणि आजही नाही. मला या चर्चेत घेतलेलेच नाही, त्यामुळे मला यावर प्रश्न विचारू नका,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. मंत्रिपदाच्या वावड्या दोन नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, “माझ्यासमोर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवारांनी या चर्चांना यापूर्वीच पूर्णविराम दिला आहे.” तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या दाव्यावरही त्यांनी भाष्य करणे टाळले. संसदेतील भूमिका मतदारसंघ पुनर्रचनेवर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार काय निर्णय घेतील, हा त्यांचा विषय आहे. मी एक छोटा आमदार आहे, त्यामुळे दिल्लीतील आणि खासदारांचे निर्णय मी घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळच्या ‘त्या’ स्टेटसचे दिले स्पष्टीकरण सकाळी ठेवलेल्या एका व्हाट्सॲप स्टेटसमुळे सुरू झालेल्या चर्चांवर आव्हाड यांनी मिश्किल उत्तर दिले. “मी सकाळी गाणी ऐकत बसलो होतो आणि मला जुन्या आठवणींमध्ये रमण्याची सवय आहे. त्यातूनच सहज काहीतरी टाईप झाले आणि ते स्टेटसला गेले, पण चूक लक्षात येताच मी ते लगेच पुसून टाकले. त्यामागे कोणताही राजकीय अर्थ नव्हता,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ———————————————- हेही वाचा… पुण्यात महायुतीच्या दिग्गजांची खलबतं: मुख्यमंत्री फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोमवारी (16 नोव्हेंबर) पुण्यात दाखल होत अमित शहा यांची भेट घेतली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू. मेरिएट हॉटेलमध्ये या बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *