![]()
मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटीतील घडामोडींना आता वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सक्रिय मराठा आंदोलक महिला ललिता तारख यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणे, धमक्या देणे तसेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांचे बनावट अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या 10 ते 11 समर्थकांवर अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जरांगे पाटील यांच्या समर्थक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भावुक होत आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, “माझ्या सोबत राहणाऱ्यांवर केसेस आणि चौकशांचा ससेमिरा लावला जात आहे,” असा संताप व्यक्त केला. नेमके काय आहे प्रकरण? आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय सहभागी असलेल्या ललिता तारख यांनी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या काही राजकीय व सामाजिक भूमिकांवर उघडपणे प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर पद्धतशीरपणे बदनामीची मोहीम सुरू झाली. ललिता तारख यांचा चेहरा एआय (AI) डीपफेक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रांवर, व्हिडिओंवर लावून ते फेसबुक, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर पसरवण्यात आले. कुटुंबाला धमक्या आणि मानसिक छळ सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट्स करण्याव्यतिरिक्त निनावी फोन कॉल्सवरून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. तारख यांनी केवळ कारवाईचीच मागणी केली नाही, तर “2023 पासून आंदोलनाच्या नावाखाली कोणी किती संपत्ती कमावली, याची माझ्यासह सर्वांची सखोल चौकशी व्हावी,” अशी थेट मागणीही तपास यंत्रणांकडे केली आहे. 5 जणांची नावे निष्पन्न, पाच ते सहा अज्ञात ललिता तारख यांनी यापूर्वी दोन वेळा पोलिसांत धाव घेतली होती. अखेर त्यांनी सादर केलेले संशयित सोशल मीडिया प्रोफाइल्स, कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि धमकीच्या ऑडिओ कॉल्सचे तांत्रिक पुरावे तपासून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजेस चालवणाऱ्यांचा समावेश असून, पाच प्रमुख आरोपींची नावे समोर आली आहेत. भगवानराव जाधव, डी. ए. उंबरे पाटील, विभीषण लिंबाजी नन्नावरे, बळीराम मोरे, संतोष पाटील राहटीकर. तसेच, इतर 5 ते 6 अज्ञात सोशल मीडिया वापरकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या लेकराबाळांनी 300 रुपयांसाठी मजुरी केली; मनोज जरांगे भावुक समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि आयकर-ईडी चौकशीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी साठेवाडी (गेवराई) येथे अत्यंत भावनिक शब्दांत आपली बाजू मांडली. “मी महिना महिना उपोषणाला बसलो, तेव्हा माझ्या घरात खायला भाजी नव्हती. नाव मोठे झाले म्हणून कोणाकडे हात पसरणार? मी घरात नसताना माझ्या पत्नीने आणि लेकरांनी ३०० रुपयांच्या रोजंदारीसाठी लोकांच्या शेतातील बांधावर कामाला जायचे. या सर्व हालअपेष्टा मनोज जरांगेने समाजाच्या लेकराबाळांसाठी सहन केल्या आहेत.” शरण जाऊन जगणार नाही “गरीब मराठ्यांचे हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांच्या जीवावर सुरू आहे. कोणीतरी मला बसण्यासाठी गाडी दिली, तर त्यांच्यावर केसेस होतात, माझ्या सोबत राहणाऱ्यांवर दंड आणि चौकशा लावल्या जातात. पण लक्षात ठेवा, मला कोणासमोर वाकून किंवा शरण जाऊन जगायचे नाही. समाजाच्या लेकरांचे रक्त विकून मी कधी मोठा होणार नाही किंवा पदे घेणार नाही; तसे केले तर मला कधी सुखाची झोप लागणार नाही,” असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. आंतरवालीतील अंतर्गत मतभेद थेट पोलीस ठाण्यापर्यंत आणि महिला आंदोलकाच्या अश्लील बदनामीच्या गुन्ह्यांपर्यंत पोहोचल्याने मराठा आरक्षण आंदोलनातील अंतर्गत वाद आता अधिक चव्हाट्यावर आला आहे. —————————————————— हेही वाचा… पुण्यात एमपीएससी आंदोलनात पत्रकाराला मारहाण: कठोर कारवाईची मागणी; मारहाण करणारा ABVP कार्यकर्ता असल्याचा आ. रोहित पवारांचा आरोप एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार निखील सुक्रे यांना एका व्यक्तीने मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून तिला अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ललिता तारख यांच्या तक्रारीनंतर जरांगेंच्या 10 ते 11 समर्थकांवर गुन्हा:AI द्वारे अश्लील फोटो बनवून बदनामीचे प्रकरण, मनोज जरांगेंचीही प्रतिक्रिया