Headlines

'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची थेट पोलीस चौकशी!:आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र; प्रशांत आंबीच्या मालमत्ता जप्तीचीही मागणी




ज्येष्ठ विचारवंत दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या वैचारिक पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलीस ठाण्याच्या चौकशीपर्यंत पोहोचला आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री फोन करून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करणारे शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी आता थेट पोलीस महासंचालकांना (DGP) पत्र धाडले आहे. या पत्राच्या आधारे कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांची चौकशी सुरू केली आहे. “हे पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहादीने आर्थिक मदत केली? याची सखोल चौकशी करून प्रकाशकाची मालमत्ता जप्त करण्यात यावी,” अशी धक्कादायक मागणी गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सुरू केलेली ही चौकशी पूर्णपणे बेकायदेशीर असून, आपण पोलिसांना नव्हे तर केवळ न्यायालयालाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करू, असा आक्रमक पवित्रा प्रकाशक प्रशांत आंबी यांनी घेतला आहे. आमदार गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र शिवीगाळ प्रकरणाची ऑडिओ क्लिप राज्यभरात व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असतानाच, आमदार संजय गायकवाड यांनी आता पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकाला कोणत्या जिहादी विचारसरणीच्या व्यक्तीने किंवा संघटनेने निधी दिला, याची गुप्तचर यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आर्थिक स्रोतांची तपासणी करून त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी. पुस्तक प्रकाशनासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणांची रीतसर परवानगी घेतली होती का, याचाही कायदेशीर छडा लावला जावा. या पत्राची तत्काळ दखल घेत कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांना चौकशीसाठी पाचारण करून तपास सुरू केला आहे. चौकशी पूर्णपणे बेकायदेशीर; कागदपत्रे कोर्टाला देणार- प्रशांत आंबी पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांनी प्रशासकीय दडपशाहीवर ताशेरे ओढले आहेत. “आमदारांच्या दबावाखाली येऊन कोल्हापूर पोलिसांनी सुरू केलेली ही चौकशी पूर्णपणे बेकायदेशीर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. ज्या पुस्तकाला 38 वर्षांचा समृद्ध इतिहास आहे, त्या पुस्तकावर अशा प्रकारचे हास्यास्पद आरोप करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.” न्यायालयातच कागदपत्रे देणार “आम्ही कोणतीही बेकायदेशीर कृती केलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या या दबावाला आम्ही भीक घालणार नाही. या पुस्तकासंदर्भातील कोणतीही अधिकृत कागदपत्रे आम्ही पोलिसांना सादर करणार नसून, जर न्यायालयाने मागितली तरच थेट न्यायालयासमोर मांडू,” असे आंबी यांनी ठणकावून सांगितले. 8 मिनिटांत 36 शिव्या आणि धमकीचा वाद या प्रकरणाची सुरुवात आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त फोन कॉलने झाली होती. पुस्तकाचे शीर्षक ‘शिवाजी कोण होता?’ असे का ठेवले, छत्रपती शिवाजी महाराज असा आदरार्थी उल्लेख का केला नाही, असा आक्षेप घेत आमदार गायकवाड यांनी मध्यरात्री प्रशांत आंबी यांना फोन करून अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली होती. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पुरोगामी चळवळी, साहित्यिक, इतिहास संशोधक आणि राजकीय वर्तुळातून गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी औपचारिक दिलगिरी व्यक्त केली होती; मात्र आता पुन्हा पत्र लिहून त्यांनी या वादाला हवा दिली आहे. वादानंतर पुस्तकाला तुफान मागणी; 4 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री! आमदार गायकवाड यांच्या धमक्या आणि शिवीगाळीचा उलटाच परिणाम पुस्तकाच्या लोकप्रियतेवर झाला आहे. गायकवाड यांनी वाद निर्माण केल्यानंतर वाचकांमध्ये पुस्तकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, अवघ्या चार दिवसांत या पुस्तकाच्या तब्बल 10 हजारहून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली. कॉ. गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये लिहिलेले हे अवघ्या 72 पानांचे छोटेखानी पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचा राजा, सर्वधर्मसमभाव मानणारा राज्यकर्ता आणि पुरोगामी राजा अशी वास्तववादी मांडणी करते. 24 भाषांत अनुवाद गेल्या 38 वर्षांत या पुस्तकाच्या 20 लाखांहून अधिक प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या असून, देशातील आणि परदेशातील तब्बल 24 भाषांमध्ये त्याचे अधिकृत भाषांतर झाले आहे. हे पुस्तक ‘लोकवाङ्मय गृह’, ‘श्रमिक प्रतिष्ठान’, ‘समाजवादी प्रबोधिनी’ आणि ‘साऊ प्रकाशन’ या 4 नामवंत संस्थांमार्फत सातत्याने प्रकाशित केले जाते. एका वैचारिक आणि ऐतिहासिक पुस्तकावरून सत्ताधारी आमदाराने घेतलेली आक्रमक भूमिका, पोलिसांकडून सुरू झालेली चौकशी आणि प्रकाशकांचा विरोध यामुळे महाराष्ट्रातील विचारवंत आणि राजकीय वर्तुळात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. —————————————————— हेही वाचा… पूर्णेकर हत्येच्या आरोपांवर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार:ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंना अटक का झाली नाही? ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, या दुःखाचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घाणेरडे राजकारण उबाठा गट करत आहे. मूळ एफआयआरमध्ये (FIR) आमचे नाव नसताना केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या पतीला यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत,” असा घणाघाती आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *