Headlines

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन




कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे महासचिव नरेंद्र घाटोळ, उपकुलसचिव विक्रांत मालवीय उपस्थित होते. सत्कारमूर्ती अजय देशमुख, भीमराव वाठोरे, अनिल चौधरी, गजानन वराडे, मोरेश्वर मुंजाळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार प्राप्त करणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. या पुरस्कारात विद्यापीठाच्या उद्यान विभागाचा मोठा वाटा आहे. विद्यापीठाच्या विस्तारलेल्या परिसरात पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान होते, जे उद्यान विभागाने यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी सर्व सत्कारमूर्तींना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांनीही आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या कार्याला उजाळा देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सत्कारमूर्ती अजय देशमुख, भीमराव वाठोरे, अनिल चौधरी, गजानन वराडे आणि मोरेश्वर मुंजाळे यांनी आपल्या सेवाकाळात सहकाऱ्यांकडून मिळालेल्या आदरभावाबद्दल आणि स्नेहाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले, तर जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन अधीक्षक डॉ. धनंजय पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. यावेळी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष राजेश एडले, सदस्य डॉ. नितीन कोळी, डॉ. साक्षी ठाकुर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे, विद्यापीठाला प्रदीर्घ सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देऊन कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा डॉ. सुलभा पाटील, मोनाली तोटे, रजनी चपाटे आणि मिनल मालधुरे यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देऊन सपत्निक सत्कार केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *