![]()
सेवानिवृत्त वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्र प्रथम’ ही भावना जपण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र २०४७ च्या दिशेने वाटचाल करत असताना, विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड कॅम्पस येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आर. के. एस. भदोरिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक विश्वस्त प्रा. पी. बी. जोशी, एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण उपस्थित होते. भदोरिया म्हणाले की, रिसोर्सेस, एनर्जी आणि तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रांत देशात मोठे बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि स्पेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये देश प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरतानाच चारित्र्य निर्मितीवरही भर द्यावा. आजची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी शक्ती असून, येत्या काही वर्षांत भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी भारतमातेसाठी समर्पित भावना जागृत करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण यांच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी, तसेच माता-पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. राहुल कराड यांनी येणाऱ्या पिढीने ‘कोलोनियल माईंडसेट’ बाजूला ठेवावा आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एनसीसी सक्तीची करावी, असे मत व्यक्त केले. एमआयटीची उभारणी ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्लो मार्चिंग करत पाहुण्यांना ध्वजवंदन स्थळी आणले. एनसीसी पथकाने रूट मार्च करत मानवंदना दिली. तसेच, विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ. दत्ता दंडगे यांनी प्रास्ताविक केले आणि हजारो विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या रक्षणाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंभूराज बानगुडे-पाटील आणि क्रिष्णा पाटील या विद्यार्थ्यांनी मानले.
Source link
विकसित भारतासाठी 'राष्ट्र प्रथम' भावना जपावी:सेवानिवृत्त वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांचे आवाहन