Headlines

डॉ. भारती पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड:म्हणाल्या- आता नव्या उमेदीने काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार




भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये 13 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल डॉ. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या नव्या जबाबदारीमुळे आता अधिक जोमाने आणि नव्या उमेदीने पक्षकार्य करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भारती पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने मंत्रिपदाची देखील जबाबदारी दिली, त्यावेळेस मी देशभर काम केले होते, आता देखील मला नव्या उमेदीने काम करता येईल, अशा भावना पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना भारती पवार म्हणाल्या, देश पातळीवर पक्षाचे संघटनात्मक काम करण्यासाठी मला नक्कीच ऊर्जा मिळेल. कार्यकर्त्यांचा आणि पक्षातील वरील नेत्यांचा आदर आहे. भविष्यकाळात पक्षाच्या सर्व कामांसाठी मी देशभर जबाबदारी पार पाडेल. जेन झी आणि जेन अल्फा हे पाश्चिमात्य शब्द असले तरी पारंपरिक युवा शक्ती, युवा नेतृत्त्व यामाध्यमातून युवा भारत बघतो. नरेंद्र मोदी यांनी युवा शक्तीला बळ देण्याचं काम केलं आहे. सर्वांनी भारताच्या प्रगतीसाठी काम करणं आवश्यक आहे, असेही पवार यांनी म्हटले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या भाजप खासदार ते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राज्यातून पहिली राष्ट्रीय उपाध्यक्ष होण्याचा मान मिळणे, हा केवळ माझाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा अभिमान आहे, अशी कृतज्ञतेची भावना भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *