Headlines

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे




राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या-ज्या ठिकाणी अन्नप्रक्रिया केली जाते, अशा सर्व आस्थापनांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोफत शुद्ध पाण्याचे निर्देश आणि कारवाईचा इशारा अन्नसुरक्षेसोबतच ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मुंढे यांनी गांभीर्याने घेतला आहे. प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तसेच, ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ‘येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल’ अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या सर्व नियमांची आणि सूचनांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नियम पाळणे बंधनकारक तुकाराम मुंढे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावले उचलण्यात येतात, त्याची जबाबदारी राज्याच्या एफडीए आयुक्तांवर असते. 23 जून रोजी एक आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इटरिज यांनी नियम पाळणे बंधनकारक असेल. अन्न व सुरक्षा मानके यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. अन्न उत्पादन मानके, 2011 याच्यासह अनेक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.” राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत प्रशासनाने केलेल्या तपासण्यांमध्ये अन्नसुरक्षेबाबत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान आस्थापनांमध्ये अत्यंत अस्वच्छ आणि अपायकारक परिस्थितीत अन्न शिजवणे, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी एकदा वापरलेल्या तेलाचाच पुन्हा वापर करणे आणि अन्नपदार्थांसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग वापरणे अशा आरोग्यास घातक ठरणाऱ्या अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *