Headlines

बिडकीन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्या:आमदार विलास भुमरे यांची मागणी, विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित




पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पाच तरुणांच्या गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूची दखल विधानसभेत घेण्यात आली. आमदार विलास भुमरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत मृत तरुणांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भुमरे यांनी सांगितले की, बिडकीन गावातील १९ तरुण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. यावेळी समुद्रात बुडून हिमांशू कांबळे, प्रेम आदमने, आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे आणि आनंद नरवडे या पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मृतदेहांचा शोध घेण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या तत्पर सहकार्याबद्दल त्यांनी सभागृहात आभार व्यक्त केले. मृत्यूमुखी पडलेले तरुण हे आपल्या कुटुंबातील कर्ते सदस्य होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवत या सर्व पीडित कुटुंबांना तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी आ. भुमरे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *