Headlines

मराठी शाळा वाचवा अभियान 30 जूनपर्यंत:शिक्षण बचाव समन्वय समितीतर्फे जिल्ह्यात राबवले जाणार




राज्य शासनाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरण आणि बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण बचाव समन्वय समितीने अमरावती जिल्ह्यात ‘मराठी शाळा वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान २४ जूनपासून ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवले जाईल. समितीच्या मते, शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात आले आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींच्या शिक्षणाला बसणार आहे. मराठी शाळा केवळ इमारत नसून गावाच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वाच्या आहेत, या भूमिकेतून ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. सात दिवस चालणाऱ्या या डिजिटल मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. २४ ते ३० जून या काळात समितीतर्फे दररोज एक पोस्टर जारी केले जाईल. हे पोस्टर व्हॉट्सॲपवर पाठवले जातील आणि इंस्टाग्रामवरही माहिती प्रसारित केली जाईल. सहभागी नागरिकांना ही माहिती मित्र, नातेवाईक व गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. अभियानाच्या शेवटच्या दिवशी सहभागी नागरिक आपापल्या गावातील शाळेला भेट देऊन शाळेसमोर सेल्फी काढून तो फोटो पोस्ट करतील. ही माहिती शासनाच्या पोर्टलला टॅग करून राज्यभरातील डेटा शासनापर्यंत पोहोचवला जाईल. या अभियानात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. ‘आपली शाळा – आपली जबाबदारी’ या घोषणेसह मराठी शाळांच्या रक्षणासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन शिक्षण बचाव समन्वय समितीने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *