![]()
तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे. कारभारी यांच्या वृद्ध आई शांताबाई मगर यांनी आपल्या लेकाला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची एक किडनी देण्याची तयारी दर्शविली आहे. आई दाता म्हणून पुढे आली आहे. मात्र शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेला सुमारे ५ लाख रुपयांचा खर्च उभा करण्याचे मोठे आव्हान या गरीब कुटुंबासमोर आहे. पैशांअभावी हे जीवनदान सध्या रखडले आहे. मगर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. मोलमजुरी करूनच ते आपला उदरनिर्वाह करतात. नियमित डायलिसिस, महागडी औषधे, रुग्णालयाचा इतर खर्च यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. घरात वृद्ध आई, पत्नी, दोन अपत्यांची जबाबदारी सांभाळताना उपचारांसाठी लाखो रुपयांची रक्कम उभारणे कारभारी यांच्यासाठी अशक्यप्राय ठरत आहे. एका बाजूला मुलाला वाचवण्यासाठी आईची धडपड सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला पैशांची विवंचना आहे, अशी हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक दिवस ठरतोय कठीण परीक्षा घरातील कर्त्या पुरुषाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने संपूर्ण कुटुंब तीव्र चिंतेत ग्रासले आहे. आजाराशी सुरू असलेली ही झुंज आणि वाढती आर्थिक अडचण यामुळे घरात कमालीची शांतता आणि गांभीर्य पसरले आहे. उद्याचा दिवस काय घेऊन येईल? या भीतीने कुटुंबीयांची झोप उडाली आहे. वेळेत प्रत्यारोपण झाल्यास कारभारी मगर यांना नवे आयुष्य मिळू शकते.
Source link
आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी