![]()
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री आशिष शेलार यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, भोगल्या दुःखाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या.. जय शारदे.. वागेश्वरीची प्रार्थना गाणाऱ्या कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीतही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या.. भाषेची बंधने तोडून 20 पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या.. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या आणि भाऊबीजेला ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती’ अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझी प्रिय बहीण मी आज गमावली पुढे आशिष शेलार म्हणतात, माझ्यासाठी तर माझी प्रिय बहीण मी आज गमावली. साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही. माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली. त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत, असे शेलार यांनी म्हटले आहे. आशिष शेलार यांनी आशा भोसले यांचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की काही दिवसांपूर्वीचीह ही एक संस्मरणीय भेट. आशाताई, काय लिहू? सारेच निशब्द- चंद्रशेखर बावनकुळे याचसोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशाताई, काय लिहू? सारेच निशब्द आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. ते म्हणाले, आशाताई, काय लिहू? सारेच निशब्द झाले. निव्वळ चैतन्य लिहू की दैवी सूर लिहू? वयाला व आवाजाला मिळालेले ययातीचे तारुण्य लिहू? तुम्ही अद्भुत! जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणे क्षणभर निमालं! संपलं. आम्ही अपूर्ण झालो. पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुरांच्या वैविध्यावरील तुमचे भाष्य म्हणजे, तुम्ही संगीतातील विद्यापीठ. एक युग संपले. आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदर माणुसकीचं, चविष्ट पाककलेचं अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं. मना, तुझे मनोगत मला कधी कळेल का? तुझ्यापरी गूढ.. सोपे होणे मला जुळेल का? असा प्रश्न विचारणाऱ्या तुम्ही उत्तर देऊन निघून गेल्या. कायम प्रसन्न आशादायी आशा, आज निराशा करून पुढच्या प्रवासाला कायमची निघून गेली. आशाताई, तुम्ही गायलेली कितीतरी गाणी मनात आहेत. डोक्यात आहे. हृदयात आहेत. काय लिहू आशाताई? तुमच्या जाण्याने दैवी सुरांची आशा संपली. आशाताई नावाचे आनंदाचे गाव.. राम राम करून दूर निघून गेले. ताई, तुम्ही अजरामर आहात, अशा शब्दात बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Source link
भाऊबीजेला 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती' ओवाळणी गाणारी:माझी प्रिय बहीण मी आज गमावली, आशिष शेलारांची भावनिक पोस्ट