![]()
पोलिस दलातील लाचखोरी, खंडणीखोरांना अभय आणि खुनाच्या प्रकरणात आरोपींना मदत होईल असे कृत्य करण्यासारखे अनेक गंभीर प्रकार पुढे येत आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी पोलिसांचे कृत्य हे गंभीर गुन्ह्यासारखे असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु पोलिसांच्या चुकांसाठी करण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी 1959 च्या ‘पोलिस मॅन्युअल’चा आधार घेतला जातो. या कालबाह्य मॅन्युअलमध्ये अनेक गंभीर प्रकरणातीत दोषी पोलिसांना काही हजारांचा दंड करून सोडून दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांत राहून गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसांसाठी हे मॅन्युअल सुरक्षा कवच, वॉशिंग मशीन ठरत असल्याचे चित्र काही घटनांमधून लक्षात येते. सामान्यांसाठी गुन्हे तेच, पण गुन्हेगारी पोलिसांसाठी फक्त नाममात्र दंड सामान्य नागरिकासाठी एखादे बेकायदेशीर कृत्य, वागणूक हा थेट गुन्हा असतो. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कोठडीची हवा दाखवली जाते. मात्र हेच कृत्य पोलिस दलासाठी केवळ दंडास पात्र असते. लाचखोरी, खंडणी, खुनाच्या तपासातील कसुरी करूनही पोलिस अवघ्या हजार-दोन हजारांचा दंड, ताकीद,समज देऊन सोडून दिले जात आहे. पोलिस मॅन्युअलमध्ये सुधारणा गरजेची सध्याचे पोलिस मॅन्युअल फार जुने आहे. कायद्यात जशा सुधारणा होत आहेत तशा मॅन्युअलमध्ये होणे गरजेचे आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दाखल एका गुन्ह्याच्या खटल्यात सुनावणीदरम्यान न्यायालयाने देखील मॅन्युअलमध्ये सुधारणा करण्याचे निष्कर्ष नोंदवले आहे. यामुळे पोलिसांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीवर नियंत्रण ठेवता येईल. ॲड. केतन ढाके, कायदेतज्ज्ञ. केस नं 1
लाखांची खंडणी, पण एक हजार रुपये देऊन सुटले सायबर विभागाशी संबंधित एका प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीकडून 1 लाख रुपयांची लाच घेतल्याचे चौकशीत सिद्ध झाले; परंतु वरिष्ठांनी सुधारण्याची संधी म्हणून या तिन्ही लाचखोर पोलिसांना प्रत्येकी 1000 रुपये दंडाची नाममात्र शिक्षा देऊन सोडून दिले. केस नं 2
खुनाच्या खटल्यात सबळ पुरावे गाळले, 2 हजारांचा दंड खुनाच्या एका गंभीर खटल्यात एका पोलिस उपनिरीक्षकाने तपासादरम्यान सीसीटीव्हीचे 65 ब प्रमाणपत्र जोडले नाही, रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठवले नाहीत. या त्रुटी असल्याने कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडले. या हलगर्जीपणासाठी या अधिकाऱ्याला केवळ 2,000 रुपये दंड करून सोडून दिले. केस नं 3 शासकीय स्पर्धेला दांडी, खासगी क्रिकेट खेळले दोन पोलिस कर्मचाऱ्यांची 36 व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती; दोघांनीही या स्पर्धेला दांडी मारल्याने संघाचे पदक हुकले. या स्पर्धेच्या दिवशी दोघेही शहरातच एका खासगी क्रिकेट स्पर्धेत खेळत होते. या उर्मट वर्तनासाठीही त्यांना 1 हजार रुपये दंड करून सोडून देण्यात आले.
एक लाख रुपये लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी ठोठावलेल्या दंडाचे आदेश.
Source link
पोलिस ‘मॅन्युअल’ बनले वॉशिंग मशीन, खाकीवरचा डाग 1 हजारात स्वच्छ!:लाखाची लाच, खुनाच्या तपासात गंभीर नसलेल्या पोलिसांना नोकरीत ‘कालबाह्य मॅन्युअल’चे सुरक्षा कवच