Headlines

पुरंदरमध्ये सासवड पोलिसांची मोठी कारवाई:बोपगाव येथील गोदामातून 21 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त




सासवड पोलिसांनी बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका गोदामावर छापा टाकून 21 लाख 70 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. मानवी आरोग्यास घातक असलेला हा साठा बेकायदेशीरपणे साठवण्यात आला होता. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बोपगाव गावच्या हद्दीतील एका गोदामात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा करून ठेवण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित केलेला हा साठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. या माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने तातडीने कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या गोदामावर छापा टाकला. छाप्यादरम्यान गोदामाची झडती घेतली असता, तेथे सिग्नेचर फिनेस्ट पान मसाला, ॲक्शन 7 कंपनीचा सुगंधित तंबाखू”, आर. के. कंपनीचा सम्राट पान मसाला” आणि “आर. के. कंपनीचा एस.टी-1 सुगंधित तंबाखू” असा विविध प्रकारचा प्रतिबंधित मुद्देमाल आढळून आला. जप्त केलेल्या या साठ्याची एकूण किंमत 21 लाख 70 हजार 960 रुपये आहे. याप्रकरणी सासवड पोलिसठाण्याचे पोलिसशिपाई प्रणय राजेंद्र मखरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सिराज शेख (रा. शितल पेट्रोलपंपाशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम-2006 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलिस अंमलदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले आणि पल्लवी काळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *