Headlines

पर्यटनाला बळ:मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन; भूसंपादनासाठी‎ अक्कलकोटमध्ये प्रशासकीय हालचाली‎




योगेश कबाडे | अक्कलकोट मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी प्रशासन स्तरावरुन गती घेतली जात आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ९ गावांमधील शेती १६५ गट व ९८० शेतक-यांचे क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार सलगर, अक्कलकोट ग्रामीण, हासापूर आणि हत्तीकणबस या गावांचे अधिक क्षेत्र असू शकते. प्राथमिक भूसंपादन प्रस्तावात अनेक गटांचा समावेश केला आहे. अंतिम अधिसूचना, संयुक्त मोजणी व हरकतीनंतरच बाधित क्षेत्राचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गात उत्सुकता आणि चिंता असे संमिश्र वातावरण आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गात काही ठिकाणी शासकीय जमीन, ग्रामपंचायत मालमत्ता, वन विभागाचे क्षेत्र, नदी, नाले, तलाव आणि रस्ते यांचाही समावेश आहे. त्यामुळे विविध विभागांना जमीन हस्तांतरण प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. सध्या समोर आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून अंतिम अधिसूचना, संयुक्त मोजणी, हरकतींची सुनावणी आणि नुकसानभरपाई प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कोणत्या जमिनी संपादित होणार आणि किती क्षेत्र बाधित होणार याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बाधित गावांतील शेतकरी आणि जमीनधारकांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. उपलब्ध माहितीनुसार सलगर गावात सर्वाधिक गट क्रमांक प्रकल्पासाठी प्रस्तावित आहेत. येथे खासगी शेतीबरोबरच वन विभागाच्या जमिनी, रस्ते आणि नाल्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. अक्कलकोट ग्रामीण परिसरातील अनेक गट या प्रकल्पाच्या मार्गात येत आहेत. धार्मिक संस्थांच्या नावावरील काही जमिनी, खासगी शेती, रस्ते आणि नदी क्षेत्राचा काही भागही संपादन प्रक्रियेत येण्याची शक्यता आहे. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे अक्कलकोट, सोलापूर भागात व्यवसाय, उद्योगाला चालना मिळेल. शहराभोवती विविध राष्ट्रीय महामार्ग, सुरत- चेन्नई मार्गाचा विकास झाला आहे. आता बुलेट ट्रेनमुळे तीर्थक्षेत्र स्थळी पर्यटकांची रेलचेल वाढेल. स्थानिक जीवनमानामध्ये बदल होईल. सचिन कल्याणशेट्टी, आमदार. . पर्यटन, हॉटेल, लॉजिंग, वाहतूक आणि व्यापार क्षेत्राला नवे बळ मिळण्याची शक्यता. . स्थानिक युवकांसाठी सेवा, पर्यटन व व्यावसायिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. . अक्कलकोटचा प्रमुख शहरांशी संपर्क अधिक वेगवान होईल. . परिसरात जमिनीचे भाव आणि व्यावसायिक गुंतवणूक वाढण्याची शक्यता. . औद्योगिक व पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळू शकते. . धार्मिक पर्यटनासोबतच बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा. मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन साठी प्राथमिक भूसंपादन प्रस्तावात १६५ गटांचा समावेश केला आहे. बाधित शेतकरी ९८० आहेत. अंतिम अधिसूचना, संयुक्त मोजणी व हरकती नंतरच बाधित क्षेत्राचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *