![]()
घाटनांद्रा चारणेरवाडी शिवारातील जुना नदीच्या खोलीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो एकर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. चारणेरवाडी परिसरातील शेतजमिनी प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाणी वेगाने वाहून जात असल्याने त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नव्हता. हीच अडचण लक्षात घेऊन तलाव उभारणीऐवजी नदी खोलीकरणाचा व्यावहारिक पर्याय निवडण्यात आला. काम अंतिम टप्प्यात आल्याच्या निमित्ताने या योजनेचे पूजन सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शोभाबाई घुसिंगे, ज्योतीबाई काटे, गोराबाई जोनवाल, कोमल गवारे, ज्योतीबाई वाल, विजय घुसिंग, गोकुळ राजपूत, शिवलाल ताटू, गणेश शिंदे, सुभाष भोपळे, संजय शिंदे आदी उपस्थित होते. चारणेरवाडी शिवारातील नदीच्या खोलीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नदीचे ४०० मीटरपर्यंत खोलीकरण नदीचे ४०० मीटर अंतरापर्यंत आणि जमिनीपासून ४ मीटर खोलीपर्यंत खोलीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे पात्रात मोठा पाणीसाठा निर्माण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बारमाही पाणीसाठा निर्माण होणार असून, परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना मिळणार आहे.
Source link
घाटनांद्र्यात नदी खोलीकरण पूर्णत्वाकडे:शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार, शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार फायदा