![]()
खरीप हंगामात शेतकऱ्याला एखादी गंभीर अडचण आली किंवा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, की त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, आता मार्गदर्शनासाठी कोणाला फोन करायचा? वैजापूर तालुक्यात या प्रश्नाचे कोणतेही स्थानिक उत्तर मात्र कृषी विभागाकडे मिळत नाही. तब्बल १६४ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात कृषी विभागाची स्वतःची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा नियंत्रण कक्ष नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक स्तरावर कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम राज्य शासनाच्या टोल-फ्री आणि व्हॉट्सॲप तक्रार व्यवस्थेच्या भरवशावर सोडण्यात आला आहे. खरीप हंगामातील प्रत्येक दिवस शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. बियाणे, खते किंवा कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. मात्र, दारापर्यंत पोहोचणारी कोणतीही गतिमान स्थानिक व्यवस्था कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. राज्याची व्यवस्था असली, तरी वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याला ऐन संकटाच्या आणि तातडीच्या क्षणी नेमका कोणाचा आधार घ्यावा, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. तालुक्यात स्वतंत्र हेल्पलाईन नसल्याने शेतकऱ्यांना १८०० २३३ ४००० या टोल-फ्री किंवा ९८२२४४६६५५ व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी लागते. तालुक्यात उपविभागीय कृषी अधिकारी १, तालुका कृषी अधिकारी १, कृषी मंडळे ४ (वैजापूर, महालगाव, शिऊर, गारज) तर एकूण गावे १६४ आहेत. कृषी सहाय्यक ४८ असून, एकाकडे सरासरी ३ ते ४ गावे देण्यात आलेली आहेत. किती तक्रारी आल्या? कृषीकडेच उत्तर नाही राज्यस्तरीय टोल-फ्री व व्हॉट्सॲप हेल्पलाईनचा आधार सांगणाऱ्या कृषी विभागालाच वैजापूर तालुक्यातून आजवर किती तक्रारी नोंद झाल्या, त्यापैकी किती निकाली निघाल्या आणि किती प्रलंबित आहेत, याची स्पष्ट माहिती देता आली नाही. शेतकऱ्यांना हेल्पलाईन वापरण्याचा सल्ला दिला जात असताना, तिच्या प्रत्यक्ष वापराचा स्थानिक लेखाजोखाच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कृषी सहायकांद्वारे गावांत जनजागृती केली जाते Ã शासनाची केंद्रीकृत तक्रार निवारण व्यवस्था कार्यरत आहे, त्यामुळे स्वतंत्र हेल्पलाईनची गरज भासली नाही. विभागाद्वारे गावांत माहिती दिली जाते. – आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी, वैजापूर
Source link
वैजापूरमध्ये कृषी विभागाला नियंत्रण कक्षाचाच विसर:शेतकऱ्यांना मनस्ताप, गावांतील शेतकरी राज्यस्तरीय तक्रार व्यवस्थेवर अवलंबून