Headlines

भेसळखोरांचे धाबे दणाणले:कारवाईच्या धास्तीने जामखेडात दुग्धजन्य पावडरच्या 50 गोण्या वनक्षेत्रात फेकल्या, दिघोळ-तेलंगशी रस्त्यावरील प्रकार




राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील दिघोळ–तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरसदृश पदार्थाच्या तब्बल ५० ते ६० गोण्या बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ जून रोजी परिसरातील एका शेतकऱ्याच्या निदर्शनास वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात पावडरने भरलेल्या गोण्या आल्या. संबंधित शेतकऱ्याने तातडीने दिघोळचे सरपंच दशरथ राजगुरू यांना याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच राजगुरू यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. गोण्यांचा एवढा मोठा साठा रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येथे आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत सरपंच दशरथ राजगुरू यांनी तात्काळ खर्डा पोलीस ठाणे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर खर्डा पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संपूर्ण प्रकरणाची वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीने सखोल चौकशी करून संबंधित पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, तसेच हा साठा येथे टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या या सर्व गोण्या घटनास्थळीच पडून असून, त्यामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि जनावरांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या साठ्याची योग्य विल्हेवाट लावून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कारवाईच्या धास्तीनेच हा दुग्धजन्य साठा वनक्षेत्रात टाकून दिला असावा, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ–तेलंगशी रस्त्यालगत दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरसदृश पदार्थाच्या फेकलेल्या गोण्या. दूध संकलन केंद्रांशी संबंध? विशेष म्हणजे, या परिसरात खर्डा, तेलंगशी, दिघोळ, माळवाडी, जायभायवाडी, मोहरी आणि जातेगाव आदी गावांमध्ये अनेक दूध संकलन केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे या बेवारस गोण्यांचा आणि दुग्ध व्यवसायाचा काही संबंध आहे का, याबाबतही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या गोण्यांमध्ये नेमका कोणता पदार्थ आहे, तो निकृष्ट दर्जाचा, भेसळयुक्त किंवा वापरास अयोग्य आहे का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने अथवा पशुपालकाने या पावडरचा जनावरांच्या खाद्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापर करू नये, तसेच या पदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *