![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पांदन रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत, या प्रमुख मागणीसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्थानिक बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उपाध्यक्ष प्रा. शरद पुसदकर आणि तालुका अध्यक्ष दिनेश धवस यांनी केले. महिला आघाडी प्रमुख सुषमा मुळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. यावेळी पश्चिम विदर्भ प्रमुख डॉ. पी. आर. राजपूत, पद्मा राजपूत, शहर प्रमुख रियाज खान, अशोक हांडे, विभाग प्रमुख राहुल राऊत, अनिल वानखडे, विलास धांदे, अशोक केसरखाने, मधुकर स्वगे, बबन कुचे, संकेत चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पांदन रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच लोणी टाकळी येथील २०१० पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या आणि नियमित दंड व कर भरत आलेल्या नागरिक, विशेषतः महिलांच्या राहत्या भूखंडांचे पट्टे त्यांच्या नावावर करून देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी आंदोलकांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी पांदन रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, रखडलेल्या कामांमुळे मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. निवेदनातील मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीने कळवले आहे.
Source link
पांदण रस्त्यांची कामे सुरू करा:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा, शेतकरी, महिला व पदाधिकाऱ्यांचा सहभाग