![]()
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे, याची खात्री करण्यासाठी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी रविवारी २८ जूनला सकाळी ८ वाजता पूर्वसूचना न देता अग्निशमन केंद्र व आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी परिसराची पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुक्तांनी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध यंत्रसामग्री, उपकरणे व साहित्याची पाहणी केली. कोणते साहित्य कार्यरत आहे, कोणते बंद स्थितीत आहे, त्याची कारणे काय, दुरुस्तीची स्थिती काय आहे, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. या वेळी त्यांनी उपकरणांचे प्रात्यक्षिक करून घेत त्यांची कार्यक्षमताही तपासली. पाहणीत उपस्थिती नोंदवहीची तपासणी करताना एक कर्मचारी वारंवार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत कर्मचाऱ्यावर शासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्याला विनाकारण सुटी देऊ नये, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.आपत्ती व्यवस्थापन विभाग शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी २४ तास सज्ज असणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, साहित्य यांचे नियोजन सक्षम असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षिततेसाठी अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. अग्निशमन विभागात उडाली खळबळ मनपा आयुक्त पूर्वसूचना न देताच अग्निशमन मुख्यालयात धडकल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. रविवारी मनपा आयुक्त विभागात येतील, याची कल्पनाही कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केली नव्हती. मात्र, अचानक भेटीमुळे सर्व कर्मचारी जागे झाले. गैरहजर अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर ते जमेल तसे कार्यालयात उपस्थित झाले. या भेटीमुळे यंत्रणेत असलेल्या उणीवाही प्रशासनाच्या ध्यानात आल्या.
Source link
निष्काळजीपणे काम करणाऱ्यांवर कारवाई:महापालिका आयुक्त वर्षा लड्डा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सज्जतेची पाहणी