![]()
राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘फ्लिंट अँड वार्सा’सह सहा आस्थापनांवर कारवाई एफडीएने 27 जून रोजी नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित रेस्टॉरंटचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय, बोरीवलीतील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या बेकरीवरही कठोर कारवाई करण्यात आली. याच मोहिमेत भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबवरही धाड टाकून नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. नागरिकांना आवाहन; संशयास्पद अन्नाबाबत तक्रार करा अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन एफडीएने केले आहे. कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थाबाबत संशय असल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर बनावट FDA अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय? एफडीएच्या सातत्यपूर्ण कारवायांदरम्यान एक धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. बोरीवली पश्चिमेतील ‘आहार’ हॉटेलवर स्वतःला एफडीए अधिकारी सांगणाऱ्या दोन बनावट व्यक्तींनी धाड टाकल्याची घटना समोर आली. या दोघांनी अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी देत हॉटेल मालकाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचेचे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप आहे. मात्र, हॉटेल मालकाला संशय आल्याने त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीत हे दोघे बनावट अधिकारी असल्याचे उघड झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी द्यावे दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. ग्राहक आल्यावर त्यांच्यासमोर थेट बाटलीबंद पाणी ठेवण्याऐवजी शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी हॉटेलमध्ये तसा फलक लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्राहकाने स्पष्ट मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका अन्न व औषध प्रशासनात भ्रष्टाचाराच्या आरोपांची पार्श्वभूमी असताना राज्य सरकारने 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात गुटखा, पानमसाला, निकृष्ट अन्नपदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. मुंबईतील नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर झालेली ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग मानली जात असून, पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Source link
मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स-रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई:थेट परवानेच केले निलंबित, बनावट FDA अधिकाऱ्यांचाही पर्दाफाश