![]()
राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक
.
विशेष बाब म्हणजे, हा गोंधळ केवळ एका माध्यमापुरता मर्यादित नसून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्या आहेत. शाळा सुरू होऊन प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. बालभारतीच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षकांनाही मुलांना शिकवताना अनेक अडचणींचा व मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकवली
गणिताचे धडे देणाऱ्या ‘बालभारती’ने नव्या पाठ्यपुस्तकात थेट थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच बदलण्याचा अक्षम्य प्रताप केला आहे. रामानुजन यांचे निधन 26 एप्रिल 1920 रोजी झाले असताना, पुस्तकात ती तारीख चुकीने 27 एप्रिल 1920 अशी छापण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ ऐतिहासिक माहितीतच नव्हे, तर गणिताच्या मूळ संकल्पना, लांबी-वजन आणि भागाकार यांसारख्या पाठांमधील आकड्यांमध्येही बालभारतीने मोठी गडबड केल्याचे उघडकीस आले आहे.
गणिताच्या पुस्तकातले गणितही बिघडवले
गणिताच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 55 वरील स्वाध्यायात ‘ब गटा’त ‘1000 किलोग्रॅमपेक्षा जास्त’ या अचूक पर्यायाऐवजी ‘1000 ग्रॅमपेक्षा जास्त’ असा चुकीचा पर्याय देण्यात आला आहे. असाच गोंधळ इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही पाहायला मिळत असून, पान क्रमांक 77 वर ‘40+9 = 49’ असायला हवे असताना तेथे चक्क ‘रुपये 1.40+9 = 49’ असे चुकीचे गणित छापले आहे. पाठ्यपुस्तकांमधील या अत्यंत गंभीर चुकांमुळे बालभारतीचा ‘बिनचूक’ पुस्तकांचा दावा फोल ठरला असून, या ढिसाळ कारभारामुळे लाखो चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी एकप्रकारे खेळच मांडला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘बालभारती’कडून प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे उत्तर
या संपूर्ण प्रकरणावर ‘बालभारती’ने “हा केवळ छपाईतील दोष (प्रिंटिंग मिस्टेक) असावा, याबाबत संबंधित समितीची बैठक बोलावली आहे,” असे मोघम उत्तर देत या गंभीर चुकांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राज्यभरात शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला असताना, गणिताच्या पुस्तकातील या अक्षम्य चुकांबाबत ‘बालभारती’ आता नेमके काय स्पष्टीकरण देणार आणि या गोंधळात तातडीने कशी सुधारणा करणार, याकडे शिक्षण क्षेत्रासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी-भविष्याशी थेट खेळ मांडला गेलाय- वर्षा गायकवाड
दरम्यान, या प्रकरणावर कॉंग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ झाला असून, बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या गणिताच्या पुस्तकात झालेल्या अक्षम्य चुकांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी आणि भविष्याशी थेट खेळ मांडला गेला आहे. एकीकडे राज्यात पेपरफुटीची सत्रं थांबायला तयार नाहीत, तर दुसरीकडे थेट प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातच अशा गंभीर चुका करून विद्यार्थ्यांसमोर चुकीचे ज्ञान गिरवण्याची वेळ आणणे अत्यंत लाजिरवाणे आहे.
पुढे बोलताना वर्ष गायकवाड म्हणाल्या, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने महाराष्ट्रातील जनतेला उत्तर दिले पाहिजे. आमची सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की, ज्या पालकांनी ही गंभीर चुका असलेली पुस्तके विकत घेतली आहेत, त्यांना शासनाने तात्काळ ‘जुन्या पुस्तकांच्या बदल्यात नवीन सुधारित छापील पुस्तके’ मोफतच उपलब्ध करून दिली पाहिजेत. निव्वळ शुद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार नाही.
शिक्षणमंत्र्यांनी आतातरी या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि बालभारतीच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक निलंबनाची कारवाई करावी. शिक्षण व्यवस्थेतील हा निष्काळजीपणा आतातरी थांबला पाहिजे! आणि भविष्यात अशा चुका पुन्हा कधीही घडू नयेत, याची दखल सरकारने आत्ताच घेतली पाहिजे.