![]()
जून महिना संपून जुलै उजाडला, तरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले आहे, मात्र अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात, पण पावसाच्या एकाही सरीविना ते परत जात असल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा-पुन्हा मावळत आहेत. परिसरात केवळ दोन-चार वेळा रिमझिम सरी कोसळल्या, ज्यामुळे जमिनीमध्ये पिकांसाठी आवश्यक असलेला पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. जोरदार आणि सलग पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकांची स्थिती सुधारणार नाही, असे कृषी जाणकारांचे मत आहे. यंदा आधीच महागडी बियाणे, खतांच्या वाढलेल्या किमती, डिझेल-पेट्रोलमुळे वाढलेला मशागतीचा खर्च आणि शेतीमालाच्या भावाची अनिश्चितता यांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपावर संकटाचे ढग दाटले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडीफार सुविधा आहे, त्यांनी नाइलाजाने पेरणी तर सुरू केली, मात्र महावितरणकडून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणेही अवघड झाले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कोरड्या मातीत ‘धुळपेरणी’ उरकून घेतली होती. मात्र, त्यानंतर पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने आता ही धुळपेरणी वाया जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने अंकुरलेले कोंब कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे कोमजू लागले आहेत. पुढील २ ते ४ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ही पिके पूर्णपणे जळून जातील आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरींनी गाठला तळ पिंपळदरी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे भूजल पातळी खालावली असून विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. शेती तर दूरच, पण ग्रामीण भागात आता पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाऊस नसल्याने परिसरात हिरवा चारा उपलब्ध नाही, परिणामी पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
Source link
शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट:पिंपळदरी परिसरात पावसाअभावी खरीप धोक्यात, मृग नक्षत्र कोरडे, आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले