Headlines

पारडातील दुहेरी खूनाला 12 दिवसानंतर वाचा फुटली:करणीच्या संशयावरून हत्या, तिघे जण अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई




हिंगोली तालुक्यातील पारडा येथील वृध्द दांम्पत्याच्या खून प्रकरणाला अखेर १२ दिवसानंतर वाचा फुटली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना शुक्रवारी ता ३ ताब्यात घेतले आहे. त्यांनी करणीच्या संशयावरून हा खून केल्याची कबुली दिली आहे. हिंगोली तालुक्यातील पारडा येथील बळीराम वाघमारे व त्यांची पत्नी कलावती वाघमारे यांचा शेतातील आखाड्यावर मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये दोघांचाही धारदार शस्त्राने खून केल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून अनिल वाघमारे यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिस ठाण्यात ता. २१ जून रोजी गुुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती घेण्यास सुरवात केली होती. त्यानंतर या प्रकरणातील संशयीतांची नांवे स्पष्ट झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस.अरसेवार, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार पांडुरंग राठोड, गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, निरंजन नलवार, सतिश जाधव, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे, इरफान पठाण, मारोती काकडे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. ३ राहुल खंदारे (रा. इसापुर रमना), अक्षय वाघमारे (रा. पारडा) राजू वाघमारे (रा. पारडा) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. आरोपी राजू वाघमारे याच्यावर दोघांनी करणी केल्याने त्याची प्रकृती बिघडत होती असा संशय घेऊन बळीराम वाघमारे व कलावती वाघमारे यांचा राजू वाघमारे याने राहुल खंदारे व अक्षय वाघमारे यांना सोबत घेऊन ता. २१ जून रोजी रात्री हत्याराने वार करून खून केल्याचे स्पष्ट केले. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे पुढील तपास करीत आहेत. हे ही वाचा… हिंगोलीत टीनपत्रे काढून दुकान फोडले:चोरट्याने 2.40 लाख रुपये पळविले, सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली शहरातील बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरटयाने गल्लयातील २.४० लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ३ पहाटे घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सविस्तर वाचा… औंढा नागनाथ मंदिर परिसरात ‘FDA’चा मोठा छापा:उघड्यावरील 1 क्विंटल पेढा जप्त करून केला नष्ट देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथे येथे मंदिराच्या परिसरात उघड्यावर पेढा विक्री करणाऱ्या 7 दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून तब्बल 1 क्विंटल पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औंढ्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *