![]()
रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर एसटीच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. परंतु त्याचवेळी ट्रक मात्र सुसाट धावत होते. या अफलातून आदेशामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी काँग्रेसच्या मदतीने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे अडचणीत आलेल्या तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांचा रोष शांत केला. त्यानंतर लगेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि एसटीचे आगार व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांची बाजू समजून घेत बंद असलेली बस वाहतूक पुन्हा सुरू केली. जड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश दिले होते. परंतु हे निर्देश रेल्वेच्या मालधक्कावरून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांनी नाकारले होते. दरम्यान एसटी महामंडळाने त्या निर्देशाचा आदर केल्याने विद्यार्थ्यांना सुमारे दीड किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागत होते. परिणामी त्यांना शाळा-महाविद्यालयाची वेळ पाळणे अशक्य झाले होते. नेमक्या याच कारणामुळे विद्यार्थ्यांनी आज ऐनवेळी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत बस वाहतूक तात्काळ पूर्ववत करण्याबाबत आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र दिले. या पत्रानुसार बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. आंदोलनात हिराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसह काँग्रेसचे पंकज वानखडे, आशिष शिंदे, मयूर डुबे आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या दिला. बस वाहतूक बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला दररोज उशीर होत होता. याचा त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भीती होती. शिवाय पायी चालण्याचा मानसिक त्रासही त्यांना सहन करावा लागत होता. मुळात ट्रकची वाहतूक सुरू आहे, तर एसटीच का बंद, असा युक्तिवाद कामी आला. या आंदोलनाला काँग्रेसची साथ असल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या एका बाजूला मालधक्कावरून पुढे जाणाऱ्या वाहनांची लांब रांग लागली होती.
Source link
अजब आदेश! ट्रक वाहतुकीलामुभा पण एसटीची चाके थांबवली:विद्यार्थ्यांच्या चक्काजामसमोर नमले प्रशासन, 2 तासानंतर बस सुरु