Headlines

मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप




मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं? मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील ‘यास्मिन पार्क’ इमारतीबाहेर काल (गुरुवारी) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला (वय १७) ही मुलगी काही कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने ती पाण्यातून वाट काढत पुढे जात असतानाच, पाण्यात उतरलेल्या विजेचा तिला जोरदार धक्का लागला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणाचा आरोप; पोलिसांचा तपास सुरू या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. एमआयएमचे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी एका खाजगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच या निष्पाप मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा शॉक खाजगी कंपनीच्या चुकीमुळे लागला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सलग दुर्घटनांनी नागरिकांमध्ये संताप साकीनाका दुर्घटना: कालच गुरुवारी कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. विजेचे धक्के: बुधवारी साचलेल्या पाण्यातून जाताना दोन तरुणींना शॉक लागून त्या बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच मुंब्र्यात आलियाचा बळी गेला आहे. हेही वाचा.. मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. सविस्तर वाचा राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *