Headlines

कचरा टाकणाऱ्यांना दंड करा- आ. जगताप:कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ मनपा अधिकारी उतरणार रस्त्यावर




शहरातील सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे साचलेले ढीग, विस्कळीत पाणीपुरवठा अशा नागरी समस्यांवर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (३ जुलै) महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत नगरसेवक व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचना न ऐकणार्‍या कर्मचार्‍यांच्या बिनपगारी करण्याच्या सूचना दिल्या. आमदार जगताप यांच्या सूचनेनंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीचे वरिष्ठ अधिकारी आजपासून रस्त्यावर उतरून उपाययोजना करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी स्पष्ट केले. आमदार जगताप यांच्या उपस्थितीत महापालिकेत विविध नागरी समस्यांवर काल बैठक झाली. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, कुमार वाकळे, अनिल बोरुडे आदींसह भाजप-राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. टीव्ही सेंटर व बालिकाश्रम रस्त्यावरील सिंधू मंगल कार्यालय परिसरात व शहरातील काही ठराविक ठिकाणी सतत कचरा टाकला जातो. मनपा कर्मचारी वसाहतीसमोरही कचरा टाकला जातो, अशी तक्रार वारे, बोरकर, बोरुडे यांनी केली. त्यावर बोलताना आमदार जगताप यांनी कचरा टाकणार्‍या घरांना ५०० रुपये दंड करावा व तेथील सफाई कामगार आणि स्वच्छता निरीक्षक यांच्यावर १५ दिवसांची बिनपगारी रजेची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परिक्षीत बीडकर यांनी सांगितले की, कचरा संकलन, साफसफाईचे सूक्ष्म नियोजन केले आहे. पण, आमचे कर्मचारीच एका ठिकाणी कचरा गोळा करतात व नंतर त्यावर नागरिक कचरा टाकतात. त्यावर आमदार जगताप यांनी सर्व कर्मचार्‍यांना बोलावून एकदा समजावून सांगा, ऐकत नसतील तर कारवाई करण्याचे सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वॉलमनला आठवड्यातून दोन वेळा त्या-त्या भागातील नागरिकांच्या सह्या घ्यायला सांगा, नंतर त्यावर नगरसेवकांच्या सह्या घ्या, अशी सूचना पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांना आमदार जगताप यांनी केली. झाड पडून दुर्दैवी घटना घडल्यास उद्यान विभाग जबाबदार अनेक ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर झाडांच्या फांद्या रस्त्यावर लोंबकळत असताना दिसतात, तुम्हाला दिसत नाही का? एखादी घटना घडल्यावर दखल घेणार का? रस्त्यावर फांद्या आलेल्या झाडांचा तत्काळ सर्वे करा, अशा सूचना आमदार जगताप यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. याचा अहवाल करून उद्यान विभागाला पत्र द्यावे. एखादी घटना घडल्यास उद्यान विभाग जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पथदिव्यांच्या खांबावरील केबल काढून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *