![]()
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, संस्कृती, निष्ठा आणि चारित्र्य येथील प्रत्येक नागरिकाच्या आचरणात दिसू लागले, की ‘अहिल्यानगर’ हे शहराचे नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, तर स्वैराचार, क्रूरता, आक्रमण आणि धर्माच्या नावाखाली खोटे काम करणाऱ्या प्रवृत्तींना विरोध आहे, असा संदेश उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज यांनी दिला. राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांच्या समाधी सान्निध्यात महावीर नगरमधील श्री चंदनमल सुराणा (देहरेकर) जैन धर्म स्थानकात प.पू.श्री. प्रविणऋषीजी व प.पू. तिर्थेशऋषीजी म.सा. यांचे चातुर्मासानिमित्त मंगल आगमन झाले. या प्रसंगी आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. या सोहळ्यात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ‘आनंदतीर्थ’ मोबाईल ॲप आणि ‘समर्पण चातुर्मास’ कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण अत्यंत थाटामाटात करण्यात आले. जैन धर्म स्थानकाचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी स्वागत केले. समर्पण चातुर्मास समितीचे अध्यक्ष बाबुशेठ बोरा व महामंत्री आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, यंदाचा चातुर्मास अहिल्यानगरसाठी महापर्वणी ठरणार आहे. या चातुर्मासाचे मुख्य आकर्षण म्हणजे येत्या १३ ऑगस्ट रोजी तब्बल ४००० तपस्वींचे एकत्रित महादर्शन घेण्याचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक योग भाविकांना लाभणार आहे. या प्रसंगी आमदार जगताप आणि ॲड. सुभाष काकडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला पोपटलाल कटारिया, नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब वाकळे, अनिल बोरूडे, मनोज ताठे, विलास कटारिया, राजेश भंडारी, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसर्डा आदी उपस्थित होते. हा चातुर्मास आव्हाने पेलण्याची नवी ऊर्जा देईल हा चातुर्मास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विकासासोबतच सामाजिक आव्हाने पेलण्याची नवी ऊर्जा देईल. चातुर्मासात जेथे कुठे अडचण येईल, तेथे मी स्वतः खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही देत या देशपातळीवरील सोहळ्यासाठी तन-मन-धनाने समर्पित राहण्याचा संकल्प आमदार जगताप यांनी केला.
Source link
अहिल्यादेवींचे विचार आचरणामध्ये आणा:"अहिल्यानगर' नाव सार्थ करा, आ. संग्राम जगतापांच्या उपस्थितीत ''आनंदतीर्थ'' ॲप लाँच