![]()
तालुक्यातील कुंभारी येथे अकोला येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत ‘सहभागी ग्रामीण अध्ययन उपक्रम’ यशस्वीरित्या राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करून आपले उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गावाची सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करणे, ग्रामस्थांच्या थेट सहभागातून गावाच्या विकासाच्या मुख्य गरजा ओळखून त्यावर उपाय शोधणे हा होता. कृषी विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गावाचा सामाजिक नकाशा व संसाधन नकाशा तयार केला. यासोबतच गावातील शेती पद्धती, पीक पद्धती, हंगामी दिनदर्शिका आणि गावातील उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनांचा विस्तृत अभ्यास करण्यात आला. वेशीवर आणि चौकाचौकात ग्रामस्थांनी गावासमोरील प्रमुख समस्या, शेती करताना येणाऱ्या अडचणी, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत कृषीदूतांना अत्यंत मौल्यवान माहिती दिली. या संपूर्ण उपक्रमात कृषीदूत सुमित बोबडे, आशिक हत्तीमारे, तुषार महादूले, हर्षल म्हळसने, अक्षय नासनवार यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, कृषी व्यवस्था आणि गावाच्या विकासासाठी लोकसहभागाचे काय महत्त्व असते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच ग्रामस्थांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती, सामुदायिक विकासाबाबत जागरूकता निर्माण झाली. वरिष्ठांचे मार्गदर्शन सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे आणि डॉ. गजानन तुपकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल खाडे, डॉ. वर्षा अपोतीकर यांचे विशेष तांत्रिक मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास कुंभारी गावातील शेतकरी बांधव, महिला, युवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमांचे स्वागत करून भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Source link
कृषीदुतांकडून बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक:कुंभारी येथे शेतकऱ्यांसाठी उपक्रम; लोकसहभागातून ओळखल्या गरजा