14 दुचाकीद्वारे राहणार सतत गस्त
.

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरम्यान पावसाळ्यातील शासकिय सुटी व विकेंड अर्थात शनिवारी, रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. यातच चिखलदरा व परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ व ५ जुलै हा पहिलाच विकेंड आहे. यातच चिखलदरा येथे मागील काही तासांपासून सुरू असलेला सततधार पाऊस लक्षात घेता विकेंडला पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसपी निकेतन कदम यांनी चिखलदरा व परिसरातील सर्व मार्ग, पॉइन्ट्स या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. विकेंडला चिखलदरा व परिसरात जवळपास दोनशेहून अधिक जवान पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणार आहे.
पर्यटकांचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि सुरळीत व्हावा यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलाने व्यापक नियोजन केले आहे. पर्यटनस्थळे, व्ह्यू पॉईंट्स, मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे आणि पार्किंग व्यवस्थेवर पोलिस लक्ष ठेवणार आहेत. पर्यटकांना तत्काळ मदत, मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी १४ पोलिस मोटरसायकल रायडर्स सतत गस्त घालणार आहेत. या रायडर्सना बॉडी वोर्न कॅमेरे आणि सार्वजनिक सूचना प्रणाली देण्यात आली आहे, ज्यामुळे वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होईल.
तर कारवाई अटळ मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. यासोबतच वेग मर्यादेचे उल्लंघन करणारे, धोकादायक वाहन चालवणारे, ट्रिपल सीट, हेल्मेट आणि सीटबेल्टचे नियम न पाळणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गर्दीच्या ठिकाणी चोरी, पाकीटमारी, महिलांशी गैरवर्तन आणि पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी दामिनी पथकांसह साध्या वेशातील पोलिस पथके कार्यरत करण्यात आली आहेत. सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यटकांशी नम्र, संवेदनशील आणि मदतशील वर्तन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी, दरीजवळ सेल्फी न काढण्याचे आणि संरक्षक कठड्यांच्या पलीकडे न जाण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवरून चालताना सावधगिरी बाळगावी. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट किंवा पार्किंगमध्ये अवास्तव दर आकारणी, फसवणूक अथवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास, तत्काळ ११२ या पोलिस टोल फ्री क्रमांकावर किंवा या व्हॉट्सॲप क्रमांक ८३८००४४१०० वर संपर्क साधावा. पोलिस ठाण्यातील येथील पीआय नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.