![]()
अकोट- खंडवा रेल्वे मार्गाच्या कामामुळे शेतात पाणी साचले आहे. तातडीने रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी संघटनेने (रघुनाथ दादा प्रणित) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संघटनेने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन सादर केल्याची माहिती विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिली. रेल्वे विभागाने अकोट ते खंडवा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. माती टाकून धावपट्टी उंच करण्याचे काम उन्हाळ्यात सुरू होते. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठणार नाही, यासाठी रेल्वे प्रशासनाने नदी व नाल्यांचे मार्ग मोकळे करायला हवे होते. शेतकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. याचा विपरीत परिणाम शेतीवर झाला आहे. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. पिकांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई जाहीर करावी. भरपाई मिळेपर्यंत रेल्वेचे काम तात्काळ थांबवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिला. या भागात साचले सर्वाधिक पाणी : अकोट- खंडवा रेल्वे मार्गावरील कामामुळे अडगाव बुद्रूक, मालठाणा, तळेगाव बाजार, हिवरखेड, दानापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नदी-नाल्यांचा प्रवाह रोखला गेल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
Source link
रेल्वेच्या कामामुळे शेतात पाणी; भरपाई तातडीने द्या:शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन