![]()
येथील पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत जप्त केलेला तब्बल एक कोटी ७५ लाख ८६ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर जाळून नष्ट केला आहे. यामध्ये सुमारे २४६ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या विविध अमली पदार्थांचा (ड्रग्ज) समावेश होता. ही विल्हेवाटीची मोठी कारवाई नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात पार पडली. अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये दाखल झालेल्या ५६ गुन्ह्यांमध्ये गांजा, एमडी ड्रग्ज, मॉर्फिन आदी अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा सर्व मुद्देमाल आतापर्यंत अकोला पोलिस मुख्यालयातील केंद्रीय अमली पदार्थ गोदामात कडक सुरक्षेत ठेवण्यात आला होता. नष्ट करण्याची प्रक्रिया: कायदेशीर मंजुरी : जप्त केलेल्या एक कोटी ७५ लाखांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व स्तरांवरून आवश्यक परवानग्या मिळवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सुरुवातीला अमली पदार्थ नष्ट करण्यापूर्वी संबंधित न्यायालयाची रीतसर पूर्वपरवानगी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अमली पदार्थांच्या विल्हेवाटीबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे व कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले. विल्हेवाट लावताना पर्यावरणाची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी घेण्यात आली. ही विल्हेवाट प्रक्रिया ‘ड्रग डिस्पोजल कमिटी’चे सदस्य (अपर पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षक), दोन शासकीय पंच, व्हिडिओग्राफर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली.
Source link
एक कोटी 75 लाखांचे जप्तअमली पदार्थ जाळून नष्ट:अकोला पोलिसांची कारवाई; 56 गुन्ह्यांमधील जप्त केलेला होता मुद्देमाल