Headlines

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान




रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे सेनेत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे यांचे कुटुंब आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यातील स्थानिक राजकीय स्पर्धेमुळे हा वाद अधिकच गाजला. महायुती सरकारमध्ये दोन्ही पक्षांकडून रायगडवर दावा करण्यात आल्याने पालकमंत्रिपदाचा निर्णय अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिला आहे. सब्र का फल मीठा होता है एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले म्हणाले, “आम्ही ज्या पदाची वाट पाहत होतो, ते आता मिळणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्याची घोषणा होईल. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.” यावेळी त्यांनी “सब्र का फल मीठा होता है” असे म्हणत आपल्या समर्थकांना संयम बाळगण्याचा सल्लाही दिला. “घाई करायची नाही. पुढची टर्मही महायुतीची आणायची असेल तर वरिष्ठ नेतृत्वाच्या सल्ल्यानुसारच सर्वांनी काम करावे,” असेही त्यांनी सांगितले. शिंदेंनी दिले होते आश्वासन काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भरत गोगावले यांच्यासह स्थानिक आमदारांना पालकमंत्रिपदाबाबत सकारात्मक संकेत दिल्याची माहिती समोर आली होती. योग्य वेळी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल आणि शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गोगावले यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या आश्वासनाची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तटकरे विरुद्ध गोगावले संघर्षाची पार्श्वभूमी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे मजबूत राजकीय वर्चस्व आहे. दुसरीकडे, महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार, याकडे महायुतीतील दोन्ही पक्षांचे लक्ष लागले होते. स्थानिक विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि जिल्ह्यातील राजकीय प्रभाव या दृष्टीने पालकमंत्रिपद महत्त्वाचे मानले जात असल्याने हा वाद केवळ पदापुरता मर्यादित न राहता स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या लढाईतही परिवर्तित झाला. महायुतीत तोडगा निघण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर याबाबत अनेकदा चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीतील समन्वय बिघडू नये म्हणून हा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता भरत गोगावले यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवडाभरात सरकारकडून अधिकृत घोषणा होणार का, याकडे आता महायुतीतील कार्यकर्त्यांसह रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *