![]()
येथील रेल्वे गेट वेळेत न उघडल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि डोणगाव येथील हरिदास रुस्तम वाकळे (४३) या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिदास वाकळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पत्नी व भावाने त्यांना तातडीने खासगी वाहनातून लासूर स्टेशन येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी रेल्वे गेट बंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे गेल्यानंतर गेट उघडले खरे, परंतु वाहतूक कोंडीमुळे वाकळे यांचे वाहन बाहेर काढण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ वाया गेला. त्यानंतर त्यांना सावंगी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हरिदास वाकळे यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची मागणी ११ जून रोजीदेखील अशाच प्रकारे रेल्वे गेट बंद असल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने जावेद मन्सुरी यांचा मृत्यू झाला होता. एकाच महिन्यात दोन निरपराध नागरिकांचा बळी गेल्याने लासूर स्टेशन येथे तातडीने रेल्वे उड्डाणपूल किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी डोणगाव व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Source link
लासूर रेल्वे गेट बंद राहिल्याने डोणगावच्या व्यक्तीचा मृत्यू:वेळेत उपचार मिळाले नाही, एकाच महिन्यात घडली दुसरी घटना