Headlines

युवकांच्या पुढाकाराने सीना नदीत पुन्हा पाणी:स्ववर्गणीतून चारी खोदून 3 कि.मी.वरून आणले पाणी; नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा‎




सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने बोरगाव, दिलमेश्वर व करंजे परिसरातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पावसानेही पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र या परिस्थितीत काही युवकांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या सहकार्याने नदीपात्रात अडकलेले दगड, वाळूचे थर व इतर अडथळे हटवून आलेश्वरपासून बोरगावपर्यंत चारी खोदून पाणी आणले. त्यामुळे या तीन गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले होते. नदीकाठावरील विहिरी व पाण्याचे स्रोतही कमी होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळवणे कठीण झाले होते. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. अशा वेळी बोरगाव येथील काही युवकांनी एकत्र येत नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अडवणारे दगडांचे लोट व वाळूचे थर जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. या उपक्रमात जयसिंग घाडगे यांच्या नेतृत्वाखाली नाना भोगल, नीलेश पाटील, सोमनाथ गायकवाड, पप्पू ढवळे, अक्षय घाडगे यांच्यासह दिलमेश्वर व करंजे येथील युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांच्या एकजुटीमुळे आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कोरडे पडलेले सीना नदीचे पात्र पुन्हा पाण्याने भरले असून नदीकाठच्या शेतांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या उपक्रमाची पंचक्रोशीत सर्वत्र चर्चा होत असून युवकांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. युवक व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आणि स्ववर्गणीतून हे काम हाती घेतले. सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून नदीपात्रात पाणी आणण्यात यश आले. त्यामुळे बोरगाव, दिलमेश्वर आणि करंजे या तीन गावांच्या नदीकाठावरील शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या मते हे पाणी पुढील पंधरा ते वीस दिवस पुरेल, त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. पिकांना जीवदान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *