Headlines

बिबट्यांपासून बचावासाठी नागपूर विद्यापीठाने बनवला 'स्मार्ट पिंजरा':हल्ला होताच स्पीकर वाजतात, लोकांना मदतीचा मिळतो इशारा




विदर्भ आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ॲल्युमिनियमपासून ‘स्मार्ट पिंजरा’ तयार केला आहे, जो बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतो. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित रमेश बनसोड यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. या पिंजऱ्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे. या विशेष पिंजऱ्याची रचना जाळीदार असून तो डोक्यावर घट्ट बसवता येतो. उर्वरित भाग पाठीवर सुरक्षितपणे बसवलेला असतो. बिबट हल्ला करण्याच्या क्षणी पिंजऱ्यावरील हुक ओढताच तो संपूर्ण शरीराभोवती संरक्षक कवच तयार करतो. या पिंजऱ्यामध्ये आठ स्पीकर बसवलेले आहेत, जे त्वरित सक्रिय होऊन ‘वाचवा-वाचवा’, ढोल आणि इतर मोठ्या आवाजांचे सिग्नल निर्माण करतात. यामुळे बिबट घाबरून पळ काढतो, तसेच आसपासच्या लोकांना मदतीचा इशारा मिळतो. हा पिंजरा वापरण्यास सोपा असून त्यातील स्पीकर घरच्या घरी चार्ज करता येतात. सध्या विदर्भ आणि मराठवाडा भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगलक्षेत्र घटणे आणि पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी गावांकडे येत असल्याने हल्ल्यांचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी बिबट हल्ल्यांच्या घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असताना या संशोधनाने आशेचा किरण दाखवला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिया पानेकर यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *