![]()
लग्न होऊन सहा दिवस झालेली नववधू तिच्या काकांसोबत दुचाकीने माहेरी जात असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. विद्यापीठासमोर महामार्गावर सोमवारी दुपारी 4 वाजता या भीषण अपघातात नववधूचा जागीच मृत्यू झाला. वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. पारोळा ) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले आहेत. मृत वैशाली पाटील हिचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील देवरामनगर येथील पोलिस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर हे नवीन जोडपे नुकतेच देवदर्शन करून परतले होते. सोमवारी वैशालीला माहेरी नेण्यासाठी तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील (वय 40, रा.कोळपिंप्री) हे जळगावात आले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे जात असताना हा अपघात झाला. एसटीऐवजी दुचाकीने जाण्याचा घेतला निर्णय वैशालीच्या लग्नाला अवघे सहा दिवस झाले होते, तिच्या हाताची हळदही अजून फिटली नव्हती. त्यातच पुढे अमावास्या येत असल्याने नातेवाइकांनी काकांना दुचाकीऐवजी एसटी बसने जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र,काका-नववधू दुचाकीने निघाले आणि वाटेतच हा काळाचा घाला आला, ज्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जळगावात धावत्या रेल्वेचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू दुसरीकडे शिरसोली ते जळगाव रेल्वे ट्रॅकदरम्यान रेल्वेचा धक्का लागून एका 47 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. सुभाष सीताराम महाजन (47, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे रुळावरील खांब क्रमांक 416/9 ते 11च्या दरम्यान ही घटना घडली. रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांच्या माहितीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.
Source link
जळगाव विद्यापीठासमोर भीषण अपघात:भरधाव कारच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, काका गंभीर