Headlines

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:दोषींना कठोर शिक्षा द्या, प्रकरणाचा निकाल लवकर लावा, केतनच्या आईची पंतप्रधानांकडे न्यायासाठी साद




केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा, अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला झालेल्या त्रासाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. राखी अग्रवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक आईप्रमाणे त्यांनाही आपला मुलगा संसार करताना आणि आयुष्यात प्रगती करताना पाहण्याची इच्छा होती. मात्र, त्याऐवजी त्यांना मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. मुलाच्या हत्येनंतर घरातील प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरलेला असून त्याची खोली, कपडे आणि छायाचित्रे पाहून त्यांना तीव्र दुःख होते, असे त्यांनी नमूद केले. पत्रात त्यांनी आणखी एक बाब मांडली. केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या 20 दिवसांत त्यांचे सासरेही नातवाच्या दुःखातून सावरू न शकल्याने निधन पावले. त्यामुळे अल्पावधीतच कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “मी कोणतीही विशेष सवलत किंवा सहानुभूती मागत नाही. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी आणि प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय लवकर मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. केतन हा केवळ एक गुन्ह्याची नोंद नसून तो कोणाचा मुलगा, नातू आणि भाऊ होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. पत्राच्या शेवटी, “दररोज मी केतनच्या छायाचित्रासमोर उभी राहून त्याला सांगते की, ‘बेटा, तुझ्यासाठी मी अजूनही लढत आहे.’ एक दिवस ‘तुला न्याय मिळाला’ असे सांगण्याचीच माझी प्रार्थना आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *