Headlines

महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?:FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा; दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा




राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी माफिया आणि भेसळखोरांना कडक इशारा दिला आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुंढे यांनी गुटखा बंदीची अंमलबजावणी, गुटखा माफियांचे जाळे, दूध भेसळ आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील कायद्याची माहिती दिली. गुटखा बंदी असूनही राज्यात पुरवठा कसा? तुकाराम मुंढे म्हणाले की, महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर 2012 पासून बंदी आहे. मात्र, गुटखा माफियांनी आपली कार्यपद्धती बदलली असून त्यांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बंदी असली तरी शेजारच्या राज्यांतून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर या टोळ्यांनी आपले जाळे राज्याबाहेर विस्तारले. त्यामुळे पुरवठ्याचे स्रोत बदलले असले तरी बेकायदेशीर व्यापार सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्या विक्रेत्यांवरच कारवाई होते का? गुटखा विक्रीप्रकरणी लहान टपऱ्यांवर कारवाई होताना दिसते, मात्र मोठ्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, संबंधित कंपन्या राज्याबाहेरून संपूर्ण साखळी चालवत आहेत. मात्र आता अशा कंपन्यांच्या मालकांनाही थेट गुन्ह्यात आरोपी केले जात असून त्यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल नोंदवले जात आहेत. गुटखा तस्करीचा बदललेला मार्ग पूर्वी मोठ्या ट्रकद्वारे गुटख्याची वाहतूक केली जात होती. मात्र, तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी आता तस्कर चारचाकी वाहनांचा वापर करू लागल्याचे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईची पद्धतही बदलावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागणी थांबली तर पुरवठाही थांबेल! गुटख्याविरोधातील लढाई केवळ प्रशासनाने लढून उपयोग होणार नाही, असे सांगत मुंढे यांनी नागरिकांनाही आवाहन केले. “लोकांनी स्वतःहून गुटखा खाणे बंद केले तर मागणीच संपेल आणि मागणी नसल्यास पुरवठाही आपोआप थांबेल,” असे ते म्हणाले. तसेच गुटख्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगून, विशेषतः ग्रामीण भागात गुटखा सेवनाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका. विष विकत घेऊ नका,” असे आवाहनही त्यांनी केले. दुधाच्या भेसळीबाबत धक्कादायक आकडा गुटख्याबरोबरच तुकाराम मुंढे यांनी राज्यातील दूध भेसळीबाबतही गंभीर माहिती दिली. आरोग्य विभागाच्या बैठकीत सादर झालेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांपैकी सुमारे 32 टक्के नमुने ‘असुरक्षित’ आढळले आहेत. ही आकडेवारी राज्यातील अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. दूध आणि इतर अन्नपदार्थांमधील भेसळ ही केवळ आर्थिक फसवणूक नसून ती थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळखोरांना जन्मठेपेचीही तरतूद अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत भेसळीविरोधात अत्यंत कठोर तरतुदी असल्याचे सांगताना मुंढे यांनी स्पष्ट केले की, एखादा अन्नपदार्थ किंवा दूध मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित आरोपीला जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांनी कायद्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात गुटखा बंदीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी लागू केली होती. त्यानंतर वेळोवेळी या बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, एफडीए, पोलीस आणि इतर तपास यंत्रणा सातत्याने कारवाई करत असल्या तरी शेजारच्या राज्यांतून होणारी तस्करी हे मोठे आव्हान कायम आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, राज्यात गुटखा माफियांना पुन्हा डोके वर काढू दिले जाणार नाही. त्याचबरोबर नागरिकांनीही गुटखा सेवन टाळून आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *