Headlines

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असेल तर शुभेच्छा:पण असे राजकीय वातावरण तापत नाही, गिरीश महाजनांचा राऊतांना टोला




अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (१२ एप्रिल) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळेस आयोजित सभेत राजकीय भाषणांपेक्षा भावनांचा कल्लोळ अधिक पाहायला मिळाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मानस असल्याचे म्हटले होते. मात्र, याच विधानावरून आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पेटले आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेत मंत्री आदिती तटकरे अत्यंत भावूक झाल्या होत्या. “आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती. दुर्दैवाने ते स्वप्न अधुरे राहिले, पण सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून आम्ही दादांचे हे स्वप्न पूर्ण होताना पाहू इच्छितो,” असे विधान त्यांनी केले. या विधानाने राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार या आगामी मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत का? अशा चर्चांना उधाण आले. संजय राऊतांचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि भाजपला टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संधीचा फायदा घेत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, “अजितदादांना मुख्यमंत्री होता आले नाही, पण जर भाजप सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करणार असेल, तर तो त्यांचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्यापूर्वी आपला वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंऐवजी सुनेत्रा वहिनींचीच निवड करतात की काय? मला तर असे वाटतंय.” गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर: “उद्धव ठाकरेंना विसरलात का?” संजय राऊतांच्या या टीकेला भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. महाजन म्हणाले, “सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावे असे कोणाला वाटत असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. पण संजय राऊत यांनी स्वतःच काही काळापूर्वी उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते, त्याचे काय? राऊतांच्या अशा बोलण्याने राजकीय वातावरण तापत नाही.” ‘पवार’ आणि ‘ठाकरे’ नावाचे वलय दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत सुनेत्रा पवारांना आठवण करून दिली. “तुम्ही आज जे काही आहात, ते केवळ शरद पवारांमुळेच आहात. जसे आम्ही ‘ठाकरे’ या नावामुळे आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी जे वैभव निर्माण केले, त्यामुळे आमची ओळख आहे. तसेच बारामतीमध्ये ‘पवार’ नावाचे वलय हे शरद पवारांनीच निर्माण केले आहे, याचा विसर पडू देऊ नका. बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण विसरू नका,” असे राऊत म्हणाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *