![]()
शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १५ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून सुरू होता.साक्षर रोहिदास म्हस्के (वय ५८, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी), बाळासाहेब पाटील (वय ६२, रा. मोशी, भोसरी) आणि अनिल अप्पासाहेब नवले (वय ६०, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका व्यक्तीने फुरसुंगी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील देवपूरचे रहिवासी आहेत. आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष २०२१ मध्ये दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख ४५ हजार रुपये घेतले.पैसे घेतल्यानंतरही फिर्यादीच्या मुलाला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपींकडे पैशांची विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी फिर्यादीला सात लाख २८ हजार रुपये परत केले, परंतु उर्वरित १५ लाख १७ हजार रुपये परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक एस. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ट्रकचालकाला मारहाण करून लुटले, तिघांना अटक मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात एका ट्रक चालकाला धमकावून लुटल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.आनंद गजानन जामकर (वय २५, रा. सुरेखा पॅलेस, बाणेर), व्यंकटेश महादेव देवणे (वय २२, रा. निर्वाणा पॅलेस, बावधन) आणि स्वराज वैजनाथ टाक (वय २४, रा. सिंहगड कॉलेज कर्मचारी वसाहत, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ट्रक चालकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ट्रक चालक हा मूळचा पुरंदर तालुक्यातील नाझरे गावचा रहिवासी आहे. ४ जुलै रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास तो नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाला होता. कात्रज बाह्यवळण मार्गावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी हॉर्न वाजवून ट्रक थांबवला. त्यांनी ट्रक चालकाला शिवीगाळ करून केबिनमधून खाली खेचले. त्यानंतर त्याला मारहाण करून खिशातील १५०० रुपये काढून घेतले. आरोपींनी ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक ताब्यात घेतला आणि तो घेऊन पसार झाले. घाबरलेल्या ट्रक चालकाने तातडीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपींना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक एन मोकाशी पुढील तपास करत आहेत.
Source link
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक:तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल